पिस्तूल हातातून निसटल्याने तरुणाचा जीव थोडक्यात बचावला; वाचवण्यासाठी धावलेल्या दोन भावांवरही हल्ला
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गावात प्रेमविवाहाच्या रागातून नवविवाहित तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात जाऊन अवघ्या चार महिन्यांपूर्वी तरुणीने प्रियकरासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. याच विवाहाचा राग मनात धरून तिच्या सख्ख्या भावांनी भरदिवसा जावयावर कोयत्याने सपासप वार केल्याचे समोर आले आहे.
हल्ल्यादरम्यान आरोपींच्या हातातील पिस्तूल खाली निसटल्याने मोठा अनर्थ टळला आणि तरुणाचा जीव थोडक्यात बचावला. या हल्ल्यात जखमी तरुणाला वाचवण्यासाठी धावून आलेले त्याचे दोन भाऊही जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयता आणि पिस्तूल यासह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, गंभीर जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रेमविवाहाचा राग मनात धरून भरदिवसा झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे पिंपळे गाव परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







