कै. मंगलताई सौंदणकर यांच्या स्मरणार्थ रमामंगल सोशल फाउंडेशनचा समाजोपयोगी उपक्रम; ज्येष्ठ नागरिकांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
काशिनाथ शिंदे
चिंचवड, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काची जागा मिळावी, त्यांना एकत्र येऊन संवाद साधता यावा आणि परिसरात वाचन संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने शिवसेना जिल्हा संघटक तथा रमामंगल सोशल फाउंडेशनचे सर्वेसर्वा संतोष सौंदणकर यांच्या पुढाकारातून चिंचवडगावातील रस्टन कॉलनी आणि एसकेएफ कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कट्टा व वाचनालय उभारण्यात आले आहे. कै. सौ. मंगलताई रमाकांत सौंदणकर यांच्या स्मरणार्थ आणि नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त या सुविधांचे बुधवारी (दि. २) सायंकाळी लोकार्पण करण्यात आले.
रमामंगल सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संतोष सौंदणकर यांच्याकडून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच सामाजिक बांधिलकीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. ज्येष्ठांना एकत्र बसता यावे, आपले अनुभव आणि विचार एकमेकांशी शेअर करता यावेत, तसेच त्यांचा वेळ आनंददायी आणि सकारात्मक पद्धतीने व्यतीत व्हावा, यासाठी दोन्ही कॉलनी परिसरात विरंगुळा कट्टा साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांना वाचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वाचनालयाचीही उभारणी करण्यात आली.
यावेळी बोलताना संतोष सौंदणकर म्हणाले, “कै. मंगलताई रमाकांत सौंदणकर यांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या विरंगुळ्यासाठी, संवादासाठी आणि मानसिक समाधानासाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाची संकल्पना साकारण्यात आली आहे. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. रमामंगल सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”
नगरसेवक अनंत कोऱ्हाळे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाच्या अनुभवाचा आणि संस्कारांचा मोठा ठेवा आहे. त्यांना एकत्र येण्यासाठी आणि आपला वेळ सकारात्मक पद्धतीने व्यतीत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. रस्टन कॉलनी आणि एसकेएफ कॉलनीतील नागरिकांची गरज लक्षात घेऊन नगरसेवक निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
या उपक्रमाचे परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी स्वागत केले. ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याची आणि वाचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी रमामंगल फाउंडेशनचे सचिव संतोष मोरजकर, कार्याध्यक्ष सुमित कांबळे, उपाध्यक्ष गणेश ओगले, ज्येष्ठ सल्लागार समितीचे सुभाष मालुसरे, मेजर अशोक शेलार, कैलास भंडारी, नंदकुमार घोडेगावकर, हरीभाऊ क्षीरसागर, आनंद ढगे, गुलाब मुलाणी, मोहन वायकुळे, अशोक मोदगेकर, अनिल कदम, किशोर साटलकर, वैभव जनशब्दी, कांतिलाल लालवाणी, श्री. साटम, आनंदा वाघोले, अप्पा कुलकर्णी, फिरोज खान, राजू गुजराती, गणेश गाडे, ओमप्रसाद परदेशी, आश्विन मायनाळे, विकास मारणे, विक्रम तांबे, महेश शर्मा, स्वप्नील गाडे, उमेश परदेशी आदी उपस्थित होते.







