पिंपरी गावात ‘गिरनार पर्वत दर्शन’चा भव्य देखावा; धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची पर्वणी
काशिनाथ शिंदे
पिंपरी : धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानने ५१व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने ‘गिरनार पर्वत दर्शन’ हा भव्य आणि आकर्षक देखावा उभारण्यात आला असून, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांना या देखाव्याचा आनंद घेता येणार आहे.
सोमवारी (दि. १४) श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना तसेच ‘गिरनार पर्वत दर्शन’ या भव्य देखाव्याचे उद्घाटन सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गिरनार येथील गुरुवर्य, महंत, मार्गदर्शक, सेवेकरी, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि उद्योजक यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विनायक कुलकर्णी आणि आधारस्तंभ प्रवीण कुदळे यांनी दिली.
धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी
गणेशोत्सव केवळ उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचे व्यासपीठ ठरावे, या उद्देशाने मंडळाने यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने भजन, ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, गौरी सजावट स्पर्धा आणि मोदक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा, अथर्वशीर्ष पठण, स्वामी चरित्र, दुर्गासप्तशती पठण तसेच महिला भगिनींसाठी विशेष आकर्षण असलेला ‘खेळ पैठणीचा’ अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या सर्व स्पर्धा मोफत असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष केतन जाचक, खजिनदार समीर कुदळे आणि उपखजिनदार सौरभ कुदळे यांनी ही माहिती दिली.
१९७६ पासून अखंड परंपरा
सुवर्ण मित्र मंडळाची स्थापना १९७६ मध्ये झाली. गेल्या पाच दशकांमध्ये अनेक मान्यवरांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषवून संस्थेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याला व्यापक स्वरूप दिले. धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी, प्रबोधन आणि सांस्कृतिक जतनाची परंपरा मंडळाने सातत्याने जोपासली आहे.
यंदा मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या दिशेने वाटचाल करताना गणेशोत्सव अधिक उपयुक्त, समाजाभिमुख आणि आदर्शवत करण्याचा संकल्प केला आहे. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, तरुणाईचा उत्साह आणि महिला भगिनींचा मोठा सहभाग यामुळे यंदाचा गणेशोत्सव पंचक्रोशीत आदर्श ठरेल, असा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
गिरनार पर्वताच्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची अनुभूती देणारा भव्य देखावा, विविध धार्मिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ग्रामस्थ, गणेशभक्त, मंडळाचे हितचिंतक, देणगीदार तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणेशोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.






