काशिनाथ शिंदे : सातारा
सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत आरोपीला सातारा शहर डी.बी. पथकाने अटक केली आहे. या कारवाईत तब्बल सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
१६ जुलै २०२६ रोजी प्रतापसिंहनगर येथील सिद्धीविनायक मंगल कार्यालय ते अश्विनी पार्क, संगमनगर मार्गावर पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून नेले होते. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका परिसरातील अशाच प्रकारच्या सात घटनांची छाननी केली. तपासादरम्यान सर्व गुन्ह्यांमध्ये एकाच आरोपीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर सातारा शहर डी.बी. पथकाने आनेवाडी–पाचवड परिसरात सापळा रचून ४ ऑगस्ट रोजी श्रीपाद ज्ञानेश्वर लोळगे (वय ३७, रा. साईविश्व अपार्टमेंट, पाचवड, ता. वाई, जि. सातारा) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने सात ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
तपासात सातारा शहर पोलीस ठाण्यातील चार, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील दोन आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, शाहूपुरी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, सातारा शहर डी.बी. पथक, शाहूपुरी डी.बी. पथक, सायबर पोलीस तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.







