काशिनाथ शिंदे : पुणे
शहरातील गरजू आणि कष्टकरी महिलांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पुणे महापालिकेकडून विशेष आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिलांना हेल्थकार्ड देण्यात येणार असून त्यामध्ये त्यांच्या आरोग्याची संपूर्ण नोंद ठेवली जाणार आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या अभियानाचे उद्घाटन ७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान वर्षभर सुरू राहणार असून शहरातील विविध भागांमध्ये टप्प्याटप्प्याने आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. प्रत्येक महिलेची दर तीन महिन्यांनी पुन्हा आरोग्य तपासणी करून तिच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
शिबिरांमध्ये हिमोग्लोबिन, थायरॉईड, कॅल्शियम आणि रक्तदाब यांसह विविध महत्त्वाच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. आवश्यक औषधोपचार तसेच पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाईल. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार असून खासगी प्रयोगशाळा आणि डॉक्टरांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे, त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवणे आणि महिलांमध्ये आढळणाऱ्या विविध आजारांचा अभ्यास करणे हा आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता घराजवळील शिबिरांमध्ये किंवा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.







