तांत्रिक व जोखमीची कामे अनधिकृत व्यक्तींकडून करवून घेणे ठरणार गंभीर गैरवर्तणूक; संचालक धनंजय औंढेकर यांचे कठोर निर्देश
काशिनाथ शिंदे
मुंबई : महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील नादुरुस्त रोहित्र बदलणे, तांत्रिक दुरुस्ती, डीओ फ्यूज बदलणे, वीजबिल वसुली तसेच थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढणे यांसारखी तांत्रिक व जोखमीची कामे खासगी व्यक्ती अथवा अनधिकृत मनुष्यबळाकडून करून घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी याबाबत परिपत्रक काढून क्षेत्रीय मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंत्यांना कठोर निर्देश दिले आहेत.
महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे सुरक्षित संचालन, देखभाल व दुरुस्ती तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याची जबाबदारी संबंधित अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांवर आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तारमार्ग संवर्गामध्ये प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांकडे नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीतील बिघाड शोधणे, ग्राहकांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी सोडवणे, वीजबिलांची वसुली करणे तसेच थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढून आणणे यांसारखी कामे सोपविण्यात आली आहेत.
मात्र, काही तारमार्ग कर्मचारी ही कामे स्वतः न करता खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाच्या माध्यमातून करून घेत असल्याच्या तक्रारी महावितरणच्या मुख्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, अशा व्यक्तींकडे आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि विद्युत सुरक्षेचे प्रशिक्षण नसल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.
अनधिकृत व्यक्तींकडून वीजयंत्रणेवर काम करून घेतल्यामुळे संबंधित व्यक्ती तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याबरोबरच ग्राहकांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो. याशिवाय महावितरणच्या वीजयंत्रणेचे किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
केवळ अधिकृत व्यक्तींनाच कामाची परवानगी
‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (मेझर्स रिलेटिंग टू सेफ्टी अॅण्ड इलेक्ट्रिक सप्लाय) रेग्युलेशन्स, २०२३’ मधील नियम ३ नुसार केवळ अधिकृत व्यक्तीलाच वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करण्याची अथवा विद्युत वाहिन्या व उपकरणांवर काम करण्याची पात्रता आहे. त्यामुळे महावितरणकडून अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या किंवा अपात्र खासगी व्यक्तीकडून वीजयंत्रणेवरील कोणतेही काम करून घेणे हे बेकायदेशीर व अनधिकृत कृत्य ठरते.
महावितरणच्या सेवाविनियमांनुसारदेखील अशा प्रकारचा गैरप्रकार हा गंभीर गैरवर्तणुकीच्या स्वरूपात मोडतो.
दुर्घटना झाल्यास चौकशी अन् कठोर कारवाई
या पार्श्वभूमीवर संचालक धनंजय औंढेकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून काम करून घेतल्याचे किंवा अशा गैरवर्तणुकीमुळे दुर्घटना, अपघात अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे आढळल्यास संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
चौकशीअंती दोषी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सेवाविनियमातील तरतुदींनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात वीज वितरणाच्या कामांसाठी कोणत्याही परिस्थितीत खासगी किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नाही, याची वेळोवेळी खातरजमा करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.






