पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा उपक्रम; स्वच्छतेसोबत नागरिकांना दिला सर्जनशील पुनर्वापराचा संदेश
काशिनाथ शिंदे
पिंपरी: स्वच्छतेला सौंदर्यदृष्टीची जोड मिळाल्यास सार्वजनिक परिसराचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, याचा प्रत्यय चऱ्होली बुद्रुक येथील साठेनगरमधील वाघेश्वर घाट परिसरात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधील वाघेश्वर घाट परिसरात स्वच्छता व सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत परिसरातील रस्त्यालगत तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यात आली. सार्वजनिक जागेची स्वच्छता केल्यानंतर नागरिकांनी वापरात नसलेल्या तसेच टाकून दिलेल्या विविध वस्तूंचा पुनर्वापर करून त्यांना रंगरंगोटी करण्यात आली. या टाकाऊ वस्तूंना कलात्मक स्वरूप देत परिसर अधिक आकर्षक करण्यात आला.
“सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छता उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. स्वच्छतेसोबत उपलब्ध जागांचे सुशोभीकरण आणि टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील पुनर्वापर केल्यास परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलू शकतो. स्वच्छ, सुंदर पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयीची जाणीव अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे या सवयी नागरिकांनी अंगीकारणे आवश्यक आहे. नागरिक, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या सहभागातून स्वच्छतेची ही चळवळ अधिक व्यापक होईल.”
या उपक्रमामुळे वाघेश्वर घाट परिसर अधिक स्वच्छ आणि आकर्षक झाला असून, टाकाऊ वस्तूंचाही कल्पकतेने पुनर्वापर करून सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण करता येते, असा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.
यावेळी नागरिकांना ओला, सुका, सॅनिटरी तसेच विशेष काळजीपूर्वक हाताळावयाचा कचरा स्वतंत्रपणे संकलित करून महापालिकेच्या घंटागाडीतच देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले







