महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांची भेट; वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ आणि भाविकांच्या सुविधांबाबत चर्चा
काशिनाथ शिंदे : पिंपरी
देहू आणि आळंदी या दोन महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांना मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात यावे, या मागणीने आता वेग घेतला आहे. यश साने यांच्या पुढाकारातून चिखली परिसरातील ज्येष्ठ ग्रामस्थांसह महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांची भेट घेऊन देहू-आळंदी मेट्रो मार्ग सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
देहू-आळंदी हा मार्ग धार्मिक तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना मेट्रोने जोडल्यास नागरिक, भाविक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. त्यामुळे देहू ते आळंदी प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.
मेट्रो मार्गामुळे परिसरातील वाढत्या नागरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळण्यास मदत होईल. तसेच देहू आणि आळंदी या दोन धार्मिक स्थळांदरम्यान भाविकांची ये-जा सुलभ होऊन परिसराच्या विकासालाही चालना मिळू शकते. त्यामुळे भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन या मार्गाचा मेट्रो प्रकल्पात गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांनी दिले.
यावेळी चिखली येथील ज्येष्ठ ग्रामस्थ अमृतआप्पा सोनवणे, प्रदीप भाऊ आहेर, निवृत्ती शेलार, विष्णु मोरे पाटील, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब साने, मोहन ढोळ आणि राम भाऊ मोरे उपस्थित होते.
दरम्यान, उपस्थित नागरिकांनी सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाची माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष मेट्रो सफर करून प्रकल्पाच्या कामकाजाची पाहणी केली.
स्थानिक नागरिकांच्या मागण्या, परिसराचा सर्वांगीण विकास आणि भविष्यातील सक्षम वाहतूक व्यवस्था यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.







