पिंपरी : साई चौक येथे फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा आणि मॉडिफाइड रंग असलेल्या मर्सिडीज बेंझ कारवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. GJ 06 PE 4444 क्रमांकाच्या या वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर कलम १२२/१७७, १००(२)/१७७, ५०/१७७, १९८, १४६/१९६ अन्वये कारवाई करण्यात आली. वाहनाला काळ्या काचा तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर वाहनावरील काळी काच आणि ‘गोल्डन’ फॅन्सी नंबर प्लेट काढून घेण्यात आली.
या कारवाईत वाहनचालक सनी वाघचौरे यांच्यावर एकूण ६ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर अशाच प्रकारे कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.







