काशिनाथ शिंदे
पिंपरी पुणे : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच उद्योग आणि समाजाच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन आपले कौशल्य अद्ययावत करावे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती, नाविन्यपूर्ण विचार, तांत्रिक कौशल्ये आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याचा उद्देश ‘आविष्कार’ पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेतून साध्य होत असल्याचे महिंद्रा समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रवण पाटील यांनी सांगितले.
पिंपरी एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे गुणवत्ता वृद्धी व मूल्यांकन कक्ष (आयक्यूएसी) आणि संशोधन व विकास विभागाच्या सहकार्याने ‘आविष्कार २०२६-२७’ या संस्थास्तरीय प्रकल्प स्पर्धेतील पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत १०० हून अधिक प्रकल्प संघांनी सहभाग घेतला. विविध अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, ऊर्जा, पर्यावरण, सामाजिक समस्या, औद्योगिक गरजा तसेच नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी उपायांवर आधारित प्रकल्प पोस्टरच्या माध्यमातून सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांची संकल्पना, त्यामागील तांत्रिक बाबी आणि संभाव्य उपयोग याबाबत परीक्षकांसमोर सादरीकरण केले.
यावेळी पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी, आयक्यूएसीचे अधिष्ठाता व उपसंचालक डॉ. राहुल मापारी, संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन बोबडे आदी उपस्थित होते.
डॉ. हरीश तिवारी यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेऊन आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन केले. डॉ. सुदर्शन बोबडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयोजनासाठी डॉ. राहुल मापारी आणि समन्वयक डॉ. सुखदीप चौगुले यांनी सहभाग घेतला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले.






