वास्तुविशारद क्षेत्रातील संधींचा उपयोग करून करिअर घडवा : डॉ. महेश नामपुरकर
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तुविशारद क्षेत्रात मोठी स्पर्धा असली, तरी भारतात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी कमतरता असते, तिथेच संधी निर्माण होते. या संधींचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे, असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तुविशारद व आंतरराष्ट्रीय लँडस्केप डिझाईनर डॉ. महेश नामपुरकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन (एसबीपीसीओएडी) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, पुणे सेंटरचे चेअरमन आर्किटेक्ट शितेश अग्रवाल, एसबीपीसीओएडीच्या प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, यशस्वी विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ. नामपुरकर म्हणाले, “वास्तुशास्त्र हा अतिशय सुंदर व्यवसाय आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकण्याची आणि आपल्याला जे साध्य करायचे आहे ते मिळविण्याची जिद्द बाळगली पाहिजे. हे क्षेत्र तुम्हाला स्वातंत्र्य आणि सामर्थ्य देते. तसेच, भविष्यात कुठे स्थायिक व्हायचे, याची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासही देते. देशसेवा करण्यासाठीही हे एक चांगले क्षेत्र आहे.”
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माजी विद्यार्थिनी आर्किटेक्ट हरश्री नखरानी यांना २०२५ सालचा ‘सर्वोत्तम विद्यार्थी प्रेरणा चषक’ देऊन गौरविण्यात आले.
एमपीएससी स्पर्धा परीक्षेत असिस्टंट टाऊन प्लॅनर म्हणून निवड झाल्याबद्दल काजल थिटे यांचा, ‘फोएड यंग वुमन अचीवर ऑफ द इयर’ हॉस्पिटलिटी पुरस्काराबद्दल अंकिता पाटील यांचा, तर ‘स्ट्राइड मेक स्पेस डिझाईन कॉम्पिटिशन’मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिशा केला आणि आदर्श प्रधान यांचा सत्कार करण्यात आला.
पर्यावरण, शाश्वतता, वादविवाद, पोस्टर डिझाईन, बर्ड हाऊस डिझाईन आणि फोटोग्राफी या विविध क्षेत्रांत यश मिळविल्याबद्दल ओमकुमार बागले, जानवी भोसले, दिशा प्रधान, सिद्धी सावंत, भार्गवी पोहणे, आदित्य काळे, कृतिका चनी, प्रतिभा काकडे आणि सानिका काळे यांचा गौरव करण्यात आला.
कॅम्प फोटोग्राफी स्पर्धेत राधिका मंत्री यांनी प्रथम, सानिका सुतार यांनी द्वितीय, तर संदली मेंधळकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विशेष सहभागाबद्दल मृदुल मारळ, मृण्मयी चौधरी आणि ऐश्वर्या जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
‘स्कार्स ऑफ इंडिया – द अनटोल्ड बॅटल्स’ या पुस्तकासाठी स्वरा मुसळे, तर ‘कलर्स ऑफ धर्म’ या कलरिंग बुकसाठी गार्गी साठे यांना बक्षीस देण्यात आले.
विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मान
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील ४३ गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
२०२६-२७ च्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमोद भेगडे, उपाध्यक्ष मृण्मयी चौधरी, सचिव कुशा गोयल, सांस्कृतिक प्रमुख सायली केसकर, क्रीडा प्रमुख मृदुल मारळ तसेच विविध क्लबमध्ये निवड झालेल्या पदाधिकारी विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनात अजय हरताळे, इंटरनल सीनियर सुपरवायझर ऋजुता पाठक, लक्ष्मण तोरगळे आणि किसन काळे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रा. शिवा शिशोविया आणि प्रा. दक्षा देशमुख यांनी केले. आभार प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी मानले.







