काशिनाथ शिंदे : यवत
पत्नी प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे शुक्रवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत आचल यादव (वय अंदाजे १८) हिचा मृत्यू झाला. खून केल्याप्रकरणी शंकर बकस सिंग (वय २२, रा. खवपुर, जि. अमेठी, उत्तर प्रदेश) याला यवत पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरीभडक गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गाच्या सोलापूरकडे जाणाऱ्या लेनपासून सुमारे १५० मीटर अंतरावरील मोकळ्या जागेत ही घटना घडली.
आचल ही पतीला सोडून रोहन मच्छिंद्र गवळी याच्यासोबत राहत असल्याचा राग आरोपी शंकर सिंग याच्या मनात होता. याच कारणातून त्याने आचलला शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड मारून तिचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी रोहन मच्छिंद्र गवळी यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर माने करीत आहेत. खुनामागील नेमकी पार्श्वभूमी आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.







