भोसरी एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी; गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन केली अटक
काशिनाथ शिंदे
भोसरी, पुणे : दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल १३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नज्या उर्फ नाजीन अब्दुल शाह (वय ४४) याला बुलढाणा जिल्ह्यातून अटक करण्यात भोसरी एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून ही धडाकेबाज कारवाई केली.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सन २०१३ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी तेव्हापासून फरार होता. गेल्या १३ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, पोलीस हवालदार नितीन खेसे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपीचा ठावठिकाणा निश्चित केल्यानंतर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यात कारवाई करून त्याला जेरबंद केले. दीर्घकाळापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश आल्याने भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जमादार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस हवालदार नितीन खेसे, पोलीस अंमलदार सानप आणि पोलीस अंमलदार आडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले करीत आहेत.







