चार गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि मोपेडसह २ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; संत तुकारामनगर पोलिसांची दमदार कामगिरी
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात संत तुकारामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच जणांवर कारवाई केली आहे. दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी चार गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि एक मोपेड मोटारसायकल असा एकूण २ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला एच.ए. कॉलनी परिसरातील बंद हॉस्टेलजवळ एक हद्दपार गुन्हेगार थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कार्तिक श्रीनिवास शिंगाडे (वय २६, रा. खराळवाडी, पिंपरी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले असतानाही त्याने आदेशाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान कार्तिक शिंगाडे याने अनिकेत गौतम शिंदे (वय २६, रा. गांधीनगर, पिंपरी) आणि आकाश मनोज लोट (वय २५, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्याकडून पिस्तूल व काडतुसे घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अनिकेत शिंदे याच्याकडून एक गावठी पिस्तूल, तर आकाश लोट याच्याकडून दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच एमएच-१४ केसी-८४१९ क्रमांकाची मोपेड मोटारसायकलही जप्त करण्यात आली. याशिवाय त्यांचा साथीदार प्रेम दुधाजी डोंगरे याच्याकडून एक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले.
दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी आण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी परिसरात एक व्यक्ती घातक शस्त्र घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दिपक भास्कर बर्फे (वय २६, रा. पिंपळे गुरव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ संदीप आटोळे आणि सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, पोलीस हवालदार गंगाराम चव्हाण, संतोष राजपूत, पोलीस अंमलदार सुनील धावरे, सागर जैनक, ज्ञानेश्वर भुरे, भगवत गायाकवाड, दत्तू पाटकर, विठ्ठल भारस्मळ, अनिल मोहिते आणि वैभव सोनावणे यांनी ही कामगिरी केली.
शहरातील बेकायदेशीर अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री आणि शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्रधारकांना चांगलाच दणका बसला आहे







