चिंचवड, वाल्हेकरवाडी, निगडी प्राधिकरणासह ताथवडे परिसरातील लाखो नागरिकांना होणार थेट फायदा
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात महामेट्रो टप्पा क्रमांक २ (पिंपरी ते चाकण), ईआरटीएस बस सुविधा, वाहन पार्किंग तसेच सार्वजनिक शौचालय धोरणाबाबत लोकप्रतिनिधींसाठी विशेष सादरीकरण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरातील भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडण्यात आल्या.
यावेळी निगडी–रावेत–हिंजवडी या प्रस्तावित मेट्रो मार्गासोबतच भक्ती-शक्ती चौक–चिंचवड–ताथवडे असा स्वतंत्र मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि महापौर रवीभाऊ लांडगे यांच्याकडे करण्यात आली.
भक्ती-शक्ती चौक, चिंचवड, वाल्हेकरवाडी, निगडी प्राधिकरण आणि ताथवडे हा परिसर वेगाने विकसित होत असून, या भागातील लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या परिसरात शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आस्थापना, औद्योगिक क्षेत्रे तसेच विविध महत्त्वाची ठिकाणे असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते. त्यामुळे या भागाला थेट मेट्रो जोडणी मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
प्रस्तावित स्वतंत्र मेट्रो मार्गामुळे चिंचवड, वाल्हेकरवाडी, निगडी प्राधिकरण आणि ताथवडे परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. तसेच शहरातील प्रमुख भागांना परस्पर जोडण्यास या मार्गाची मोठी मदत होणार असून, वाढत्या वाहतूक कोंडीवरही काही प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होईल.
पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीच्या गरजांचा विचार करून आतापासूनच मेट्रोचे जाळे विस्तारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भक्ती-शक्ती चौक–चिंचवड–ताथवडे मेट्रो मार्गाचा प्रस्ताव गांभीर्याने विचारात घेऊन त्याच्या व्यवहार्यता आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या बैठकीमुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विस्ताराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







