काशिनाथ शिंदे
गुहागर : रोजगार, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या गुहागर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी गुहागर–पुणे–वल्लभनगर–पिंपरी-चिंचवड अशी थेट एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी पंचायत समिती गुहागरच्या सदस्या सौ. उर्वी उमेश खैर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गुहागर आगार व्यवस्थापकांकडे निवेदन सादर केले असून, १ सप्टेंबर २०२६ पासून ही बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यातील असंख्य नागरिक नोकरी, व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे गुहागर आणि पुणे-पिंपरी-चिंचवडदरम्यान नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नियमित ये-जा असते. सध्या गुहागर आगारातून पुणे शहरापर्यंत एसटी बससेवा उपलब्ध आहे. मात्र पुण्यात आल्यानंतर वल्लभनगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात जाण्यासाठी प्रवाशांना पुन्हा स्वतंत्र सार्वजनिक वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.
विशेषतः रात्रीच्या वेळी पुणे शहरात पोहोचणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होते. रात्री उशिरा पुढील प्रवासासाठी वाहन उपलब्ध होणे, त्याचा खर्च परवडणे तसेच सुरक्षिततेचा प्रश्न अशा अनेक अडचणी प्रवाशांसमोर निर्माण होतात. त्यामुळे गुहागरहून थेट पिंपरी-चिंचवडपर्यंत एसटी सेवा उपलब्ध झाल्यास या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गुहागर–पुणे–वल्लभनगर–पिंपरी-चिंचवड अशी थेट बससेवा सुरू केल्यास प्रवाशांचा वेळ आणि अतिरिक्त प्रवासाचा खर्च वाचणार असून, सुरक्षित आणि किफायतशीर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या गुहागर तालुक्यातील नागरिकांची संख्या लक्षात घेता या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गुहागर आगारातून पुणे शहरापर्यंत धावणारी एसटी बस पुढे वल्लभनगरमार्गे पिंपरी-चिंचवडपर्यंत वाढवावी आणि १ सप्टेंबर २०२६ पासून नियमित बससेवा सुरू करावी, अशी मागणी सौ. उर्वी खैर यांनी केली आहे. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.







