स्थायी समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी; ३ हजार संगणकांसाठी अँटी व्हायरस, वायसीएम रुग्णालयात अत्यावश्यक साहित्याची खरेदी
काशिनाथ शिंदे
पिंपरी, २५ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक उपक्रम आणि महापालिकेच्या डिजिटल यंत्रणेच्या सुरक्षिततेला बळ देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आले. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पुनावळेतील रस्ते व जलनिस्सारणाची कामे, पिंपळे निलखमधील रस्त्याचे डांबरीकरण, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी वैद्यकीय साहित्य, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम तसेच महापालिकेच्या संगणक यंत्रणेच्या सुरक्षेसह विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
पुनावळे परिसरातील वाढती नागरी वस्ती आणि पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन पुनावळे बी.आर.टी.एस. रोड ते पुनावळे अंडरपासदरम्यान १८ मीटर रुंद रस्ता विकसित करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामासोबतच पावसाळी पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी जलनिस्सारण वाहिन्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुधारित अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्याने या परिसरातील वाहतूक व्यवस्था आणि नागरी सुविधांना चालना मिळणार आहे.
पिंपळे निलखमधील रस्त्याचे डांबरीकरण
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विशालनगर, पिंपळे निलख परिसरातील गणपती चौक ते छत्रपती बँकमार्गे साईश्री कॉलनीपर्यंतच्या १२ मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामालाही मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अधिक सुकर आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
वायसीएम रुग्णालयाच्या सर्जरी विभागाला अत्यावश्यक साहित्य
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या सर्जरी विभागासाठी निगेटिव्ह प्रेशर वाऊंड थेरपी मशीनसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रियेनंतरच्या उपचार प्रक्रियेला अधिक प्रभावी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
याशिवाय पदव्युत्तर पदवी संस्था आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील विविध वैद्यकीय साहित्य खरेदीच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
१६माध्यमिकविद्यालयांतीलविद्यार्थ्यांना‘न्यूजपेपर इन एज्युकेशन’
महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि वाचनाच्या सवयीत भर पडावी, यासाठी ‘एज्युराईज (न्यूजपेपर इन एज्युकेशन)’ उपक्रमांतर्गत साप्ताहिक अंक उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या १६ माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
३ हजार संगणकांना अँटी व्हायरसचे कवच
महापालिकेच्या डिजिटल यंत्रणेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या ३ हजार संगणकांसाठी अँटी व्हायरस खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच तीन वर्षांच्या कालावधीसाठी एक सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्यासही मान्यता देण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या संगणक प्रणालीची सुरक्षितता आणि तांत्रिक देखभाल अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय प्रभाग क्रमांक २ चिखली परिसरातील महापालिका इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली.
“स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आलेले प्रस्ताव शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. पायाभूत सुविधा, रस्ते व जलनिस्सारण, महापालिकेची प्रशासकीय व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यावर या निर्णयांमधून भर देण्यात आला आहे. नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जाईल,” असे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले.







