मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; नरेंद्र बनसोडे यांचा निर्धार
काशिनाथ शिंदे
सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रस्ताविका स्मारकाला कथितरीत्या बेकायदेशीरपणे हटवून तोडफोड केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. स्मारकाची पूर्ववत पुनर्स्थापना करावी आणि या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा ठाम निर्धार काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीतील नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले आहेत. संविधानाने देशाला दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपण्यासाठी हे आंदोलन सुरू केल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
स्मारक हटविण्याच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करा!
नरेंद्र बनसोडे म्हणाले, “सांगवीतील संविधान चौकातील प्रस्ताविका स्मारक हटविणे आणि तेथे तोडफोड झाल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी या कृतीबाबत पोलीस आयुक्तांना लेखी कळविले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी.”
संविधानाचा सन्मान राखणे आणि नागरिकांच्या घटनात्मक मूल्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रस्ताविका स्मारकाची पूर्ववत पुनर्स्थापना आणि संबंधितांवर ठोस कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन
संविधानाच्या प्रस्ताविका स्मारकाची पुनर्स्थापना आणि संबंधित प्रकरणात कायद्यानुसार कारवाई होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे. संविधानप्रेमी नागरिक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलकांच्या वतीने करण्यात आले.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग
या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, पुरोगामी चळवळीचे नेते व विचारवंत मानव कांबळे, सामाजिक चळवळीचे नेते मारुती भापकर, ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, सर्वहारा उत्कर्ष समितीचे बी. बी. शिंदे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शाहबुद्दीन शेख, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र भोसकर, हरीश शिंदे, वीरेंद्र गायकवाड, संदीप शिंदे, सूरज माने, सदाशिव तळेकर, डेनिस देवनसन, नवीलाल मुल्ला, कबीर मोहम्मद, हिराचंद जाधव, हरीश डोळस, बाबा गायसमुद्रे, मिलिंद बनसोडे, देवदत्त रानवडे, अनिता साळवे, अनिता सोनवणे, रितिका शर्मा आणि महावेद वाळुंजकर आदी सहभागी झाले होते.







