पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे; ‘आत्महत्येबाबतची मानसिकता बदलू या’ चर्चासत्र संपन्न
काशिनाथ शिंदे
पिंपरी: विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील आणि आधार देणारे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. जीवनातील कठीण प्रसंगात आपले म्हणणे समजून घेणारी, ऐकून घेणारी आणि आपल्या पाठीशी उभी राहणारी व्यक्ती प्रत्येकाला हवी असते. मानवी संवेदना आणि योग्य वेळी मिळणारा आधार मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाने मानसिक आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहावे. एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असल्यास तिच्याकडे मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सायन्सेसमधील राहत डायट अँड वेलनेस क्लिनिकच्या वतीने आणि लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या सहकार्याने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त ‘आत्महत्येबाबतची मानसिकता बदलू या : संवादाची सुरुवात करू या’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पीसीयूचे कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी, स्कूल ऑफ सायन्सेसच्या अधिष्ठाता प्रा. रुचू कुठियाला, लायन्स क्लबचे रिजन चेअरपर्सन सलीम शिकलगार, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संतोष चव्हाण, पीसीयूचे प्रा. सौरभ चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ सानिध्या मिसाळ, डॉ. जुई पुजारी, लायन्स क्लबच्या जिल्हाध्यक्ष रश्मी नायर, पुणे अध्यक्ष संदेश मुखेडकर आदी उपस्थित होते.
डॉ. अनिल माहेश्वरी यांनी व्यसनाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अधोरेखित करून त्याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक व्यक्तीसाठी सुरक्षित, समजूतदार, आधार देणारे आणि संवादाला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण झाल्यास मानसिक अडचणींवर मात करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
प्रा. सौरभ चव्हाण यांनी भावनिक तणावातून जाणाऱ्या व्यक्तीमधील लक्षणे ओळखणे, तिच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधणे, भावनिक नियंत्रणाचे महत्त्व समजून घेणे तसेच संबंधित व्यक्तीला योग्य मदत व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सलीम शिकलगार आणि डॉ. संतोष चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. चर्चासत्रातून मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने संवाद साधण्याची आणि गरजू व्यक्तीला योग्य वेळी आधार देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली






