सोनिगरा सोसायटी ते मानकर चौकादरम्यान काँक्रीटीकरणाचे काम; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असून, कामाला गती देण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २६ मधील या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. छत्रपती चौकापासून मानकर चौकाजवळील सोनिगरा सोसायटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, सोनिगरा सोसायटी ते मानकर चौक या दरम्यानचे काम अद्याप बाकी आहे.
या ठिकाणी वाहनांची सततची वर्दळ असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे काम पूर्ण होण्यास विलंब होत असून, वाहतूककोंडीचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित मार्गावरील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ पासून वाहतूक मार्गात बदल लागू करण्यात आले आहेत.
असे असतील पर्यायी मार्ग
१. मानकर चौकाकडून छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कस्पटे कॉर्नर चौकातून पुढे आपल्या इच्छित स्थळी जावे.
२. मानकर चौकाकडून यू-टर्न घेऊन कस्पटे चौकाच्या मार्गाने इच्छित स्थळी जाता येईल.
रस्त्याचे काँक्रीटीकरण वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी वाहतूक बदलांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) सुनील शिंदे यांनी केले आहे.






