पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन; यंदा H1N1चे १९ रुग्ण, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
काशिनाथ शिंदे
पिंपरी, २५ ऑगस्ट २०२६ : वातावरणातील बदलामुळे सध्या ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखीच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्वाईन फ्लूसारख्या आजारांचा प्रादुर्भावही वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, तसेच ताप, सर्दी, खोकला, घसादुखी किंवा श्वसनाशी संबंधित लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.
इन्फ्लुएंझा H1N1 हा श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असून ताप, सर्दी, खोकला, घसादुखी तसेच श्वसनाशी संबंधित विविध लक्षणे दिसून येऊ शकतात. वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
महापालिका क्षेत्रात १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत H1N1चे १९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, योग्य वेळी वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळाल्यामुळे या कालावधीत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक भीती न बाळगता लक्षणे आढळल्यास नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
स्वाईन फ्लूपासून बचावासाठी खबरदारी
स्वाईन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. सर्दी, खोकला, ताप किंवा घसादुखीची लक्षणे दिसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा. खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंड रुमाल अथवा टिश्यूने झाकावे आणि त्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
नागरिकांनी पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी पुरेसे पाणी प्यावे. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. धूम्रपान टाळावे.
लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधे घेऊ नका
ताप, सर्दी, खोकला किंवा घसादुखीची लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत तपासणी आणि योग्य उपचार केल्यास आजाराचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य आहे.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूच्या उपचारांसाठी आवश्यक औषधोपचार उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
वातावरणातील बदलाच्या काळात नागरिकांनी स्वतःसह कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे आणि आजाराची लक्षणे दिसताच वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.







