Oplus_131072
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोशी कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या वेळी नगरसेवक निखिल शिवाजी बोऱ्हाडे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत मोशीकरांच्या समस्या आक्रमकपणे सभागृहात मांडल्या. शहरातील हजारो टन कचरा दररोज मोशी येथे टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि दैनंदिन जीवन गंभीर संकटात सापडल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
बोऱ्हाडे म्हणाले, “मोशीतील नागरिक नियमितपणे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरतात. तरीही संपूर्ण शहरातील कचऱ्याचा भार फक्त मोशीवरच का टाकला जातो? दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना केवळ मोशीकरांनीच का करायचा?” असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे ठोस मागणी करत शहरातील प्रत्येक प्रभागात ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्याची सूचना केली. प्रत्येक भागातील कचरा त्याच प्रभागात प्रक्रिया करून विल्हेवाट लावल्यास मोशीवरील ताण कमी होईल आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी सांगितले.
मोशीकरांवर होत असलेला अन्याय यापुढे सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत बोऱ्हाडे म्हणाले की, “कचरा डेपोचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेपर्यंत मोशीकरांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी माझा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील.” त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहात या विषयावर जोरदार चर्चा रंगली.
