पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाची आढावा बैठक; दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन
काशिनाथ शिंदे
पिंपरी: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी संघटनात्मक समन्वय, नियोजनबद्ध मतदार संपर्क आणि सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर जबाबदाऱ्यांचे योग्य वाटप करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा व समन्वय बैठक रहाटणी येथील विमल गार्डन येथे झाली. या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी संघटनेतील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता जगताप यांनी अधोरेखित केली. मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध संपर्क मोहीम राबवावी. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वय राखून निवडणुकीच्या कामाला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
सूक्ष्म नियोजनातून प्रचाराला गती!
निवडणुकीच्या कामात सूक्ष्म नियोजनाला विशेष महत्त्व असल्याचे सांगताना आमदार जगताप म्हणाले की, प्रचाराचे नियोजन आणि मतदार संपर्काची जबाबदारी यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा सक्रिय सहभाग वाढवून संघटनात्मक ताकद अधिक प्रभावीपणे वापरण्यावर भर दिला जाणार आहे. कार्यकर्त्यांची मेहनत, संघटनेची ताकद आणि सर्व पदाधिकाऱ्यांमधील समन्वय यांच्या बळावर दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला प्रभारी तुकाराम बजागे, संदेश भोईर, हरिश्चंद्र भोईर, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, ज्येष्ठ नेते सचिन साठे यांच्यासह भाजपचे सरचिटणीस, मंडलाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथप्रमुख उपस्थित होते.







