वंचितांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधा! – शेख दाऊद

एएसएम महाविद्यालयात ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ उत्साहात; देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग, १०० विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

पिंपरी, पुणे | काशिनाथ शिंदे

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून वंचित घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत, असे आवाहन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नातपुतणे आणि अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे संस्थापक सदस्य शेख दाऊद यांनी केले. डॉ. कलाम यांच्या विचारांचा अभ्यास करून विकसित भारताच्या उभारणीत प्रत्येकाने योगदान द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या (एएसएम) शैक्षणिक संकुलात आयोजित ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

१५० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील ९० शाळा आणि २५२ महाविद्यालयांमधील सुमारे एक हजार विद्यार्थी तसेच २०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या संघांनी आपले प्रकल्प सादर केले.

हरित ऊर्जा, सौरऊर्जा, अंतराळ संशोधन, कृषी, आरोग्यसेवा, रोबोटिक्स, संरक्षण, सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांतील १५० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी स्पर्धेची रंगत वाढवली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कसा करता येऊ शकतो, हे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांतून दाखवून दिले. या प्रकल्पांचे १०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी परीक्षण केले. स्पर्धेतील निवडक १०० विजेत्या विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली.

See also  देहूरोडमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मानवकल्याण हाच विज्ञानाचा खरा उद्देश!

एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे म्हणाले की, डॉ. कलाम यांचे विज्ञान हे केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित नव्हते, तर शेतकऱ्यांसह देशातील प्रत्येक नागरिकाचे जीवन अधिक सुखकर करण्याशी संबंधित होते. नवकल्पना विकसित करताना मानवकल्याणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हाच डॉ. कलाम यांच्या समाजाभिमुख वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खरा वारसा असल्याचे त्यांनी सांगितले.

आयसर, कोलकाता येथील नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू यांनी भविष्यातील उद्योग हे मानवकेंद्रित, रोबोटिक्सवर आधारित आणि पर्यावरणपूरक असतील, असे सांगितले. क्वांटम तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय संशोधनातून नव्या संधी निर्माण होतील. भारतीय संशोधकांना नोबेल पुरस्कार मिळणे, हीच डॉ. कलाम यांच्या स्वप्नपूर्तीची खरी दिशा ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. सिन्हा यांनी डॉ. कलाम यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत कायमस्वरूपी चुंबक विकसित करण्याच्या संशोधनासाठी कलाम यांनी प्रेरणा दिल्याचे सांगितले.

संशोधन, सर्जनशीलता आणि उद्योगाभिमुख शिक्षणावर भर

स्टेम एक्सपर्टचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी फजलू रेहमान यांनी शिक्षण आणि उद्योगक्षेत्रातील दरी कमी करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘कलाम स्ट्रीम चॅलेंज’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी डॉ. संदीप पाचपांडे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.

डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. दिलीप देशमुख यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत डीआरडीओमध्ये एकाच खोलीत काम करतानाच्या आठवणी सांगितल्या. कलाम यांचे संपूर्ण लक्ष काम, संशोधन आणि नवकल्पनांवर असायचे. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची वृत्ती आणि कामाप्रती असलेली निष्ठा आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.

See also  जुन्नरमधील घरफोडी टोळीचा पर्दाफाश! चार आरोपी जेरबंद; ३८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

चित्रपटाचा टीझर आणि पुस्तकांचे प्रकाशन

कार्यक्रमात ‘कलाम्स एंजल’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. तसेच डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित ‘माय स्टोरी : मदर’ आणि मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कलाम कॉमिक’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. संजय गुप्ता यांचा शेख दाऊद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके, तर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला आयएएस अधिकारी हिरा लाल, इस्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. सिन्हा, डॉ. एस. डी. गोकुळ, प्रा. मुरलीधर रेड्डी, डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. दिलीप देशमुख, स्टेम एक्सपर्टचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी फजलू रेहमान आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव मिलिंद चौधरी आणि एएसएमचे मुख्य विपणन अधिकारी तसेच प्रवेशप्रक्रिया व शैक्षणिक संपर्क विभागाचे संचालक जमीर मुल्ला यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

एएसएम ग्रुपचे आयपीएसचे संचालक डॉ. सुधाकर बोकफोडे, आयबीएमआरचे संचालक डॉ. व्ही. पी. पवार, डायरेक्टर जनरल डॉ. माथूर, टास्क फोर्सचे संचालक डॉ. डी. डी. बाळसराफ, डीन डॉ. विकास बरबटे, ग्रुप डायरेक्टर डॉ. मणिमाला पुरी आणि सीएसआयटीचे प्राचार्य डॉ. ललित कानोरे यांनी प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मिलिंद चौधरी यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात