आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा २१ ऑक्टोबरपासून शुभारंभ; २२ ऑक्टोबरला पारितोषिक वितरण सोहळा
काशिनाथ शिंदे
पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणच्या वतीने आयोजित आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा २०२६ ला बुधवार, दि. २१ ऑक्टोबरपासून पुण्यात सुरुवात होणार आहे. महावितरणच्या विविध प्रादेशिक विभागांतील कलावंतांच्या अभिनयकौशल्याला आणि नाट्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेचा समारोप गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरण सोहळ्याने होणार आहे.
पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, येरवडा येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता उद्घाटन समारंभ होईल. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
स्पर्धेच्या निमित्ताने महावितरणमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. नाट्यकलेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाकडे महावितरणच्या कलाप्रेमी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चार प्रादेशिक विभागांतील नाटकांची रंगत
या स्पर्धेत कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या चार प्रादेशिक विभागांतील नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. कोकण प्रादेशिक विभागाचे ‘ओल्या भिंती’, पुणे प्रादेशिक विभागाचे ‘समोरच्या घरात’, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाचे ‘वारी’ आणि नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘थलाई कूथल’ ही नाटके स्पर्धेत रंगणार आहेत.
विविध विषय, आशय आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नाट्यकलेचा अनुभव घेता येणार आहे. या स्पर्धेतून कलावंतांच्या अभिनयासह दिग्दर्शन, नेपथ्य आणि सांघिक सादरीकरणातील कौशल्याचीही कसोटी लागणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
स्पर्धेसाठी महावितरणचे राजेंद्र बावणे, धनंजय औंधेकर, सचिन तालेवार, अनुजित दिये, योगेश गाडकरी, राजेंद्र पवार, सुनील काकडे, राजेश नाईक, परेश भागवत, भुजंग खांदरे, दिनेश अग्रवाल, प्रसाद रेशमे, चंद्रमणी मिश्रा, अंकुर काबळे, संदीप पाटील, स्वाती व्यवहारे आणि अर्पणा गिते यांच्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. महावितरणच्या या नाट्यस्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच संस्थेतील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे.
स्थळ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, येरवडा, पुणे.







