राष्ट्रीय आयईईई परिसंवादात ११० प्रतिनिधींचा सहभाग; उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील समन्वयावर भर
कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे : शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय राखण्याची पीसीयूची बांधिलकी
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षणाला नवी दिशा देण्यासोबतच शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी अर्थपूर्ण समन्वय राखण्याची पिंपरी चिंचवड विद्यापीठाची बांधिलकी आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय आयईईई परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला चालना देणे, तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे, हा या परिसंवादाचा प्रमुख उद्देश होता.
या परिसंवादात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एमआयटी विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ, टी. बी. सानस महाविद्यालय, डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर, एआयएसएसएमएस, सिंहगड इन्स्टिट्यूट आणि संदिप विद्यापीठ यांसह विविध शैक्षणिक संस्थांतील ११० प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
एआयच्या माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षणाला नवी दिशा
‘एआयचलित अभियांत्रिकी शिक्षण’ या विषयावरील चर्चासत्रात उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उदयोन्मुख तंत्रज्ञान, त्याचे व्यावहारिक उपयोग, उच्च तंत्रज्ञानातील बदल आणि अभियांत्रिकी शिक्षणातील नव्या संधी यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
तंत्रज्ञानातील बदलांचा अभ्यास करून त्याचा शिक्षण आणि उद्योग क्षेत्रासाठी प्रभावीपणे उपयोग कसा करता येईल, यावर तज्ज्ञांनी आपली मते मांडली. विविध शैक्षणिक संस्थांमधील ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि उद्योगाभिमुख शिक्षण अधिक सक्षम करणे, यासाठी या परिसंवादातून महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले.
मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समितीचे सदस्य अजिंक्य काळभोर आणि नरेंद्र लांडगे तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी, अधिष्ठाता डॉ. सचिन पवार, संशोधन व विकास संचालक डॉ. भारत काळे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, नवोपक्रम व उद्यमविकास केंद्राचे संचालक डॉ. प्रणव चरखा, आंतरराष्ट्रीय संबंध केंद्राचे संचालक डॉ. विजय पाटील, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील डॉ. अमित गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यासह त्याच्या प्रत्यक्ष उपयोगांचे आकलन करण्याची संधी मिळाली. या परिसंवादामुळे संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.







