डॉ. संजय उपाध्ये यांचे मार्गदर्शन; डॉ. अभिजीत सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्यासह मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे : नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या निमित्ताने हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) चिंचवड येथे ‘हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यात ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये हे ‘धर्मसंस्थापनार्थाय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक डॉ. उत्तम दंडीमे यांनी ही माहिती दिली.
चिंचवडगाव येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. या वेळी सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
डॉ. अभिजीत सोनवणे यांना समाजभूषण पुरस्कार
‘भिकाऱ्यांचे डॉक्टर’ म्हणून सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले डॉ. अभिजीत सोनवणे यांना ‘स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांना ‘स्व. संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण पुरस्कार २०२६’, तर निलंगा येथील श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक आकाश बालाजीराव सोळंके यांना ‘कार्य गौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव सुहास पोफळे आणि समन्वयक कैलास बारणे यांनी पुरस्कारांची माहिती दिली.
मेळाव्याच्या आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांचा सहभाग
या मेळाव्याच्या संयोजनात कुमार जाधव, दत्तात्रय सूर्यवंशी, अतुल आचार्य, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, हेमदेव थापर, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले, गोविंद बोळे, अलका आर्य, तेजस्विनी जटाळ, पद्मेश कुलकर्णी, बापू मिरजकर आणि संजय भाट यांनी सहभाग घेतला आहे.
हिंदू शौर्य दिनानिमित्त आयोजित या मेळाव्यात धार्मिक विचारांचे मार्गदर्शन आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, असे दोन्ही महत्त्वाचे उपक्रम पार पडणार आहेत.







