पीसीसीओईमध्ये ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ चर्चासत्र उत्साहात संपन्न
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असते. जीवनात प्रथम ध्येय निश्चित करून त्यानुसार नियोजन करावे. सर्जनशीलतेचा वापर, आत्मविश्वास आणि सकारात्मक प्रयत्न यांच्या बळावर यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन सिटी प्राईड स्कूलच्या प्राचार्य डॉ. कांचन देशपांडे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. कांचन देशपांडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत व्यक्तिमत्त्व विकास, ध्येय निश्चिती आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या चर्चासत्रात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार, कायदा सल्लागार ॲड. परिक्रमा खोत आणि न्यू एज फायर फायटिंग कंपनीच्या संचालिका सुजल शाह यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे, अंतर्गत तक्रार समितीच्या उपाध्यक्षा सहायक प्राध्यापक वृषाली भालेराव आदी उपस्थित होते.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये!
डॉ. क्षमा उपलेंचवार यांनी महिलांच्या विविध भूमिकांवर भाष्य केले. अनेक महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच नोकरी आणि उद्योग-व्यवसायही करतात. या दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना चिंता आणि ताणतणावांचा सामना करावा लागतो. कुटुंबातील प्रत्येक नात्याची आणि कामाच्या ठिकाणी प्रत्येक पदाची जबाबदारी वेगळी असते. त्यामुळे स्वतःसाठी यशाची व्याख्या निश्चित करावी, स्वतःला योग्य प्रश्न विचारावेत, वैयक्तिक आयुष्य आणि काम यांचा समतोल राखावा तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे!
ॲड. परिक्रमा खोत यांनी समानता आणि सामाजिक बदल याविषयी आपली भूमिका मांडली. जे योग्य वाटत नाही, त्याविरुद्ध ठामपणे आवाज उठवला पाहिजे. केवळ चर्चा करून समानता प्रस्थापित होत नाही, तर आवश्यक त्या ठिकाणी संघर्षही करावा लागतो. समाजातील बदलाची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करा!
उद्योजिका सुजल शाह यांनी आयुष्यातील आव्हाने आणि काम-व्यक्तिगत जीवनातील समन्वय यावर मार्गदर्शन केले. प्रत्येकाला आपला मार्ग स्वतः तयार करावा लागतो. आयुष्यात नेहमीच सकारात्मक परिस्थिती असेल असे नाही. अनेकदा नकारात्मक परिस्थितीलाही सामोरे जावे लागते. अशा वेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समन्वय साधणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांच्या विचारमंथनासाठी खुले व्यासपीठ
प्रास्ताविकात अंतर्गत तक्रार समितीच्या उपाध्यक्षा सहायक प्राध्यापक वृषाली भालेराव यांनी महिलांना वैयक्तिक आयुष्यात समतोल राखताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, असे सांगितले. या आव्हानांवर विचारमंथन व्हावे आणि महिलांना आपले अनुभव मांडता यावेत, यासाठी पीसीसीओईने खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
डॉ. वृषाली भालेराव आणि डॉ. शिल्पा मोटेगावकर यांनी संयोजनात सहभाग घेतला. स्वागत व प्रास्ताविक डॉ. शीतल भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा कल्याणकर यांनी केले, तर डॉ. सोनल गोरे यांनी आभार मानले.







