राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन; पुण्यात आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन
काशिनाथ शिंदे
पुणे: वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चोवीस तास आव्हानात्मक परिस्थितीत अविरत सेवा द्यावी लागते. दैनंदिन कामाच्या धावपळीतही कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी नाट्यस्पर्धा हा महावितरणचा मौल्यवान सांस्कृतिक ठेवा आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.
पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात बुधवारी (दि. २१) महावितरणच्या ‘आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून राजेंद्र पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते इब्राहिम मुलाणी, दत्तात्रेय बनसोडे, स्वप्निल काटकर, धर्मराज पेठकर, मिलिंद दिग्रसकर, आयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पडळकर, मुख्य समन्वयक संजय ढोके आणि सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड उपस्थित होते.
राजेंद्र पवार म्हणाले की, नाटकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये संवादकौशल्य, वेळेचे नियोजन आणि सांघिक कामाची भावना विकसित होते. या कलागुणांचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कार्यालयीन कामकाजातही दिसून येतो. त्यामुळे अशा सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दिलीप जगदाळे म्हणाले की, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या नाट्यकृती व्यावसायिक नाटकांच्या तोडीच्या आहेत. या स्पर्धेमुळे महावितरणची रंगभूमी अधिक प्रगल्भ होत असून, कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळत आहे.
प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी प्रास्ताविक केले.
चार विभागांतील नाटकांची रंगतदार मेजवानी
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महावितरणच्या चारही प्रादेशिक विभागांतून प्रथम क्रमांक मिळवलेल्या नाट्यकृती सादर केल्या जात आहेत. पहिल्या दिवशी कोकण विभागाच्या ‘ओल्या भिंती’ या नाटकाने नाट्यरसिकांची मने जिंकली. त्यानंतर पुणे विभागाचे ‘समोरच्या घरात’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि. २२) छत्रपती संभाजीनगर विभागाचे ‘वारी’ आणि नागपूर विभागाचे ‘थलाई कुथल’ ही नाटके सादर होणार आहेत. सामाजिक आणि संवेदनशील विषयांवर आधारित या नाट्यकृतींना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला शिवदे आणि भक्ती जोशी यांनी केले, तर अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी आभार मानले.
छायाचित्र ओळ : १. महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन करताना संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कोकणचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे आणि उपस्थित मान्यवर. २. कोकण प्रादेशिक विभागाच्या ‘ओल्या भिंती’ या नाट्यकृतीतील एक प्रसंग







