नवले पुलाजवळ गाडीला धडक देत वाद; पैसे मागून जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
काशिनाथ शिंदे: पुणे
‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मराठी मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत पुण्यात धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप समोर आला आहे. नवले पुल परिसरात काही जणांनी त्यांच्या गाडीला धडक देऊन वाद घातला. त्यानंतर पैसे मागत त्यांचा हात ओढून जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे.
या झटापटीत त्यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांनी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
या घटनेमुळे पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.







