३ नोव्हेंबरला मॉप-अप दिन; वंचित बालकांनाही मिळणार जंतनाशक गोळी
काशिनाथ शिंदे
पिंपरी: बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, पोषणस्थिती सुधारणे आणि जंतसंसर्गापासून संरक्षण करणे या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत महानगरपालिका क्षेत्रातील १ ते १९ वर्षे वयोगटातील पात्र बालके आणि विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
महानगरपालिका शाळांसह शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित खासगी शाळा, अंगणवाडी केंद्रे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच अन्य पात्र शैक्षणिक संस्थांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शाळाबाह्य बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींपर्यंतही या मोहिमेचा लाभ पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शाळांमध्ये शिक्षकांच्या देखरेखीखाली, तर अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे.
वंचित बालकांसाठी ३ नोव्हेंबरला मॉप-अप दिन
२७ ऑक्टोबर रोजी विविध कारणांमुळे जंतनाशक गोळी घेऊ न शकलेल्या बालकांना आणखी एक संधी मिळणार आहे. अशा लाभार्थ्यांसाठी मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोहिमेअंतर्गत गोळी दिलेल्या लाभार्थ्यांची नोंद शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनी गोळी दिलेल्या लाभार्थ्यांच्या नावापुढे एक खूण, तर मॉप-अप दिनी गोळी दिल्यानंतर दोन खुणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकांना सहकार्याचे आवाहन
जंतसंसर्गामुळे बालकांच्या आरोग्यावर आणि पोषणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पात्र बालकांना या मोहिमेचा लाभ मिळणे महत्त्वाचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना मोहिमेत सहभागी करून घ्यावे आणि महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका म्हणाले, “बालकांच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी जंतसंसर्गापासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबर रोजी १ ते १९ वर्षे वयोगटातील बालके व विद्यार्थ्यांसाठी जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना या मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा.”
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका म्हणाले, “जंतसंसर्गामुळे बालकांच्या आरोग्यावर आणि पोषणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पात्र बालकांना शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार आहे. पालकांनी सहकार्य करून आपल्या पाल्यांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे.”






