वाल्हेकरवाडीत आगीची घटना; पर्यायी वीजवाहिनीही जळाल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी येथे महादेव मंदिराजवळील उड्डाणपुल परिसरात कचरा जाळल्याने महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्यांच्या केबल जळाल्या. सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे ताथवडे आणि पुनावळे परिसरातील सुमारे १५ ते १६ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक वीजपुरवठा बंद झाल्याने परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
महादेव मंदिराजवळील उड्डाणपुल परिसरात अज्ञात व्यक्तीने कचरा जाळल्यामुळे TACO-1 आणि TACO-2 या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्यांच्या चालू तसेच पर्यायी अशा दोन्ही २२ केव्ही इनकमर केबल जळाल्या. परिणामी, २२/११ केव्ही बेंचमार्क उपकेंद्र आणि २२/११ केव्ही पेठकर उपकेंद्रांतून निघणाऱ्या ११ केव्ही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला.
पर्यायी व्यवस्थेलाही फटका; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
चालू वीजवाहिनीसोबतच पर्यायी वीजवाहिनीची केबलही जळाल्याने अन्य मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्याच्या पर्यायांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गाच्या पश्चिमेकडील ताथवडे आणि पुनावळे परिसरातील मोठ्या भागाचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.
बाधित केबल जोडणे आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे तांत्रिक कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत. केबल दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
वीजवाहिन्यांजवळ कचरा जाळू नका!
उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या, केबल्स आणि विद्युत यंत्रणेजवळ कचरा जाळल्यास केबलचे मोठे नुकसान होऊन विस्तृत परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशा घटनांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, तसेच महावितरणच्या वीजयंत्रणेच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो.
त्यामुळे नागरिकांनी भूमिगत वीजवाहिन्यांच्या मार्गावर तसेच विद्युत यंत्रणेजवळ कचरा जाळू नये. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून वीजयंत्रणेची सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे







