काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरीतील शगुन चौक येथे विना नंबर प्लेट, काळ्या फिल्मच्या काचा आणि अशोकस्तंभाचा लोगो असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या वाहनावर ‘राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नगराध्यक्ष’ असा मजकूर लिहिलेला होता. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी वाहतूक विभागाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. संबंधित स्कॉर्पिओ वाहनाला पुढील व मागील बाजूस नंबर प्लेट नव्हती. तसेच, वाहनाच्या काचांना काळी फिल्म लावण्यात आली होती. काचांवर अशोकस्तंभाचा लोगो आणि राज्य निवडणूक आयोगाचा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०५, कलम ३(५), केंद्रीय मोटार वाहन नियमांतील कलम १००/१७७ व ५०/१७७ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३०/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
वाहनावर राज्य निवडणूक आयोगाचा उल्लेख असल्याने संबंधित वाहनाचा अधिकृत वापर आणि त्यावरील चिन्हांच्या वैधतेबाबत चौकशीतून स्पष्टता येणे महत्त्वाचे ठरणार आहे.







