महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२६ उत्साहात सुरू; १९ कर्मचाऱ्यांना हक्काची घरे, १७ जणांना नियुक्तीपत्रे प्रदान
काशिनाथ शिंदे
पिंपरी : ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणारे सफाई कर्मचारी हेच शहराच्या स्वच्छतेचे खरे शिलेदार आहेत. त्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२६’ चा प्रारंभ पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झाला. या पर्वाचे उद्घाटन भगवत प्रसाद मकवाना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष धनराज बीर्दा, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपआयुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष ॲड. सागर चरण आदींसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
मकवाना म्हणाले की, महर्षी वाल्मीकी यांनी आपल्या विचारांतून समाजाला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान आणि समान संधी मिळाली पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांची निष्ठा, समर्पण आणि मेहनत यामुळेच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक वाढत आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्यामागे प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याची मेहनत आणि सातत्यपूर्ण योगदान महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांना महापालिकेचे प्राधान्य आहे. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आणि विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी ओडिशा शासनाच्या ‘गरिमा’ योजनेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही स्वतंत्र योजना सुरू करण्याचे नियोजन असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आयुक्तांनी यावेळी केली.
१९ कर्मचाऱ्यांना हक्काची घरे; १७ जणांना नियुक्तीपत्रे
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत २५ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या १९ कर्मचाऱ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. तसेच १७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना हक्काचे घर आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर, उपआयुक्त अण्णा बोदडे आणि अखिल वाल्मीकी समाज, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजेश बडगुजर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी पर्वात रंगत
महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदाबहार गीतांच्या सुरेल कार्यक्रमाने उपस्थितांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तर महिलांसाठी आयोजित विशेष लावणी कार्यक्रमाने मराठी लोककलेचा ठसा उमटविला. गीत-संगीताच्या वातावरणात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.






