राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश; जलनिस्सारण कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश
काशिनाथ शिंदे
पिंपरी : सफाई कर्मचाऱ्यांचे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा. केवळ योजनांची माहिती देऊन थांबू नका, तर प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष लाभ मिळवून द्या, असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री दर्जा प्राप्त भगवत प्रसाद मकवाना यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम आणि त्यांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.
सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाज विकास विभागाने विशेष शिबिरांचे आयोजन करावे. या शिबिरांमध्ये योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करून लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ करावी. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करून योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे मकवाना यांनी सांगितले.
हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांच्या पुनर्वसनाला प्राधान्य
हाताने मैला साफ करण्याच्या कामात गुंतलेल्या कामगारांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या कामगारांना उपलब्ध सुविधा, पुनर्वसनाच्या उपाययोजना तसेच सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी संबंधित विभागांनी ठोस कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, जलनिस्सारण वाहिन्यांच्या स्वच्छतेच्या कामात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. या सर्वेक्षणातून कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करून त्यांच्या सुरक्षिततेसह सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले.
या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, ममता शिंदे, संदीप खोत, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, अजिंक्य येळे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध आणि प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देश मकवाना यांनी दिले.






