नव्या मेट्रो मार्गावर पहिले तिकीट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास; सहा किलोमीटरचा घेतला अनुभव
काशिनाथ शिंदे
पुणे: पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन आणि मेट्रो टप्पा-२ च्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह नव्या मेट्रो मार्गावरून प्रवास केला. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी ते हिंजवडी फेज-२ असा हा प्रवास होता. विशेष म्हणजे, नव्या मार्गावरील पहिले तिकीट मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरेदी करून मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला.
या प्रवासादरम्यान पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मेट्रो मार्ग, स्थानके आणि प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी या प्रवासात सहभागी झाले होते.
या प्रवासाचे विशेष आकर्षण ठरले ते महिला ट्रेन पायलटचे नेतृत्व. पिंक मेट्रोचे सारथ्य लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षम सहभागातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडले.
प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळकरी विद्यार्थिनी आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मेट्रो प्रवासाचा अनुभव, उपलब्ध सुविधा तसेच नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासात होणारे फायदे याबाबत त्यांनी जाणून घेतले. मुख्यमंत्री आणि मान्यवरांनी बालेवाडी ते हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकापर्यंत सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास केला.
महिला ट्रेन पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य, मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी व आयटी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद आणि नव्या मार्गावरील पहिला प्रवास अशा वैशिष्ट्यांमुळे पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचा हा प्रवास लक्षवेधी ठरला.






