पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

 

हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा मार्ग मोकळा; पुणे मेट्रो टप्पा-२ चे भूमिपूजन

२०३० पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआर क्षेत्र देशाचे महत्त्वाचे वाहतूक केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काशिनाथ शिंदे

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका-३चे उद्घाटन करण्यात आले, तर पुणे मेट्रो टप्पा-२ मधील नवीन मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात आले. या विस्तारामुळे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह शहराच्या विविध भागांना अधिक सक्षम मेट्रो जोडणी मिळणार असून, शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.

या प्रसंगी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यामुळे मोठ्या आयटी क्षेत्राला थेट जोडणी मिळणार असून, शहराच्या जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले.

देशातील मेट्रो सेवेचा विस्तार अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये देशात केवळ २४८ किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होते. आज हे जाळे सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू आहे. दररोज एक कोटीहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. महाराष्ट्रातही २०१४ मधील १० ते ११ किलोमीटरच्या मेट्रो मार्गांचे जाळे आता सुमारे २०० किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे.

मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचतो, शहरांची उत्पादकता वाढते आणि आर्थिक विकासाला गती मिळते. पुणे हे माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, औषधनिर्मिती, नवउद्योग आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने मेट्रो विस्ताराचा फायदा विविध क्षेत्रांना होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

See also  कृषिपंपांच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरण ‘मिशन मोड’वर!

२०३० पर्यंत पुणे देशाचे महत्त्वाचे वाहतूक केंद्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. मेट्रो, विद्युत बस, अंतर्गत व बाह्य वर्तुळाकार रस्ते, बोगदे आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून २०३० पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंजवडी हे देशातील महत्त्वाचे आयटी केंद्र असून, दररोज हजारो कर्मचारी या परिसरात ये-जा करतात. वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांचा एक ते दोन तासांचा वेळ वाया जातो. मेट्रो सुरू झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिवाजीनगर-हिंजवडी हा सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारण्यात आलेला देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे. टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांनी डीबीओटी तत्त्वावर या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या मेट्रोच्या उभारणीपासून संचालनापर्यंत महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो-३ हा पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कलाटणी देणारा प्रकल्प असल्याचे सांगितले. मेट्रोमुळे नागरिकांचा प्रवास वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी होणार असून, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळेल.

पुणे मेट्रोने आतापर्यंत ९० लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. सुरुवातीला मेट्रोला किती प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, नागरिकांनी मेट्रोला पसंती दिली असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे मेट्रो मार्गिका-३च्या महिला सहभागाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही मार्गिका देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार आहे. सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेच्या संचालनात सहभागी होणार आहेत.

See also  🇮🇳 थायलंडमध्ये महाराष्ट्राचा डंका! दर्पण चौधरी आणि सुमितकुमारची दुहेरी सुवर्ण झेप; अमोल बुचडे अकादमीचा आशियावर दबदबा

पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत ३१ किलोमीटर लांबीच्या आणि २८ स्थानकांच्या चार विस्तारित मार्गिकांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सुमारे ९ हजार ८५८ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली या भागांना मेट्रोने जोडण्याचे नियोजन आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे मेट्रो प्रकल्पाच्या नियोजनापासून निधी उपलब्धतेपर्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुणे मेट्रोची जीवनवाहिनी म्हणून ओळख

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रोच्या विस्तारामुळे पुण्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागांची जोडणी अधिक सक्षम होणार असल्याचे सांगितले. हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटरच्या मार्गामुळे मेट्रोचे जाळे ५५ किलोमीटरपर्यंत विस्तारणार आहे. सप्टेंबर महिन्यात पुणेकरांनी मेट्रोतून ९ लाख ५८ हजार ६०३ प्रवास केले असून, मेट्रो आता पुणेकरांची जीवनवाहिनी बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

खडकवासला-खराडी, वनाज-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली आणि मानिकबाग-नळस्टॉप या सुमारे ४६ किलोमीटरच्या नवीन मार्गांचेही भूमिपूजन करण्यात आले. मेट्रो विस्तारासोबतच पीएमपीच्या ताफ्यात नवीन बस, वर्तुळाकार रस्ते आणि भूमिगत रस्त्यांच्या विकासावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे आदी उपस्थित होते.

मेट्रो मार्गिका-३ची ठळक वैशिष्ट्ये

मार्ग: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर.

एकूण लांबी: २३.२०३ किलोमीटर.

स्थानके: २३ उन्नत स्थानके.

प्रकल्प खर्च: ८ हजार ३१३ कोटी रुपये.

उभारणी पद्धत: सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी-डीबीएफओटी).

महिला सहभाग: ९० महिला मेट्रो चालक आणि एकूण मनुष्यबळात ५० टक्के महिला कर्मचारी.

या मेट्रोमुळे हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला शिवाजीनगरशी थेट जोडणी मिळणार असून, हजारो कर्मचारी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सुलभ होण्यास मदत होणार आहे.

  • Related Posts

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    अग्निशमन दलाच्या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला; दोन जवान जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरीतील शगुन चौक परिसरात मध्यरात्री दोन पूजा साहित्याच्या…

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    कागदी दिवे, आकर्षक आकाशकंदील अन् पणत्यांच्या निर्मितीतून ‘द लर्निंग नेक्स्ट’च्या विद्यार्थ्यांनी फुलविला सर्जनशीलतेचा प्रकाश काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद,…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

    प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान