डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अत्याधुनिक पोलीस आयुक्तालयाची उभारणी; दिवंगत अजित पवार यांच्या योगदानाचा मुख्यमंत्र्यांकडून आवर्जून उल्लेख

काशिनाथ शिंदे

पिंपरी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास पोलीस यंत्रणेची कार्यक्षमता वाढते. डायल ११२ वर मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर पोलिसांचा प्रतिसाद देण्याचा कालावधी अवघ्या तीन मिनिटांवर आला आहे. महाराष्ट्राने देशात सर्वात कमी प्रतिसाद वेळ राखत प्रथम क्रमांक मिळवला असून, पिंपरी-चिंचवड पोलीसही प्रतिसाद वेळेच्या बाबतीत राज्यात अव्वल ठरले आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण तसेच पोलीस दलाच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन मंगळवारी (दि. ३) आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माधुरी मिसाळ, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दृकश्राव्य माध्यमातून शालेय विद्यार्थी व शिक्षकही सहभागी झाले होते.

अजितदादांचे स्वप्न साकार; देशातील आधुनिक आयुक्तालयांमध्ये समावेश

पिंपरी-चिंचवडमध्ये अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, अजितदादांनी या पोलीस आयुक्तालयाच्या आराखड्याच्या निर्मितीत स्वतः लक्ष घातले होते. त्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या आयुक्तालयाचे आधुनिक स्वरूप साकारले जात आहे. नागपूर आणि पुण्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्तालय देशातील अत्याधुनिक आयुक्तालयांपैकी एक ठरणार आहे. पोलीस मुख्यालयासाठी ताथवडे येथे ५० एकर जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यांमधील सुविधा आणि वातावरण अधिक चांगले असणे आवश्यक असल्याचे सांगितले. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासह वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सीसीटीव्ही यंत्रणा, अंगावरील छायाचित्रण कॅमेरे आणि आधुनिक वाहनांची आवश्यकता आहे. गुन्हेगारांकडे आधुनिक वाहने असताना पोलिसांकडेही त्यापेक्षा सक्षम वाहने असली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.

See also  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी; अश्वारूढ शिवरायांसह ‘कटिबद्ध जनहिताय’चा संदेश

अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक

पिंपरी-चिंचवड शहराचा उल्लेख झाला की दिवंगत अजित पवार यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे शहर अजितदादांचे लाडके होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा कोणताही विषय त्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला. मात्र भावनांवर नियंत्रण ठेवत त्यांनी आपले मनोगत पुढे सुरू ठेवले आणि पोलीस दलाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

पोलिसांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस

सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून पोलिसांनी सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलला.

मुख्यमंत्र्यांकडून व्यसनमुक्तीची शपथ

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहनही या माध्यमातून करण्यात आले.

  • Related Posts

    विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!

    एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी मंडई हा उत्तम व्यावसायिक अनुभव – डॉ. कीर्ती धारवाडकर; एसबीपीआयएममध्ये उद्योजकता स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या…

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    अग्निशमन दलाच्या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला; दोन जवान जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरीतील शगुन चौक परिसरात मध्यरात्री दोन पूजा साहित्याच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!

    विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण