आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम; फराळासह नवीन कपड्यांचे वाटप
काशिनाथ शिंदे
चिंबळी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रेम आणि आपुलकीची देवाणघेवाण. हाच सामाजिक बांधिलकीचा संदेश जपत आनंदी मैत्री प्रतिष्ठान, चिंचवड, पुणे यांच्या वतीने अनाथ मुली आणि वृद्ध मातांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
चिंबळी, खेड येथील ओम शांती मुलींचे अनाथ बालगृह आणि स्नेहांगण वृद्धाश्रमातील मुली व वृद्ध महिलांना दिवाळी फराळ आणि नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. अनाथ बालगृहातील चिमुकल्यांसाठी खास दिवाळी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. तर वृद्धाश्रमातील आजींना सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नवीन साड्या व कपडे भेट देण्यात आले.
फराळ आणि नवीन कपडे मिळाल्यानंतर मुलींच्या आणि आजींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या उपक्रमाचे खरे समाधान ठरले. सणाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचा आदर्श या उपक्रमातून प्रतिष्ठानने घालून दिला.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश लुंकड म्हणाले, “समाजातील दुर्बल घटकांसोबत सण साजरा करण्यातच खरा आनंद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही. यापुढेही प्रतिष्ठानच्या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”
या उपक्रमाला परेशजी संचेती, संजय शिंदे, भारती पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते






