अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; खेळाडूंना परदेशी स्पर्धांसाठी आर्थिक मदत, विविध प्रभागांतील कामांचा मार्ग मोकळा
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात ही सभा पार पडली. शहरातील रस्ते, नाले, पावसाळी जलवाहिन्या, आरोग्य सेवा, क्रीडा, नागरी सुविधा आणि पायाभूत विकासकामांसह विविध विषयांना यावेळी मान्यता देण्यात आली.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना आर्थिक बळ
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागांतर्गत विविध खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यास मंजुरी देण्यात आली. प्रांशु सदाशिव सूर्यवंशी याला इजिप्त येथील ज्युनियर विश्वचषक स्पर्धेसाठी, साजिद करीम तांबोळी व अन्वर मुक्तार अन्सारी यांना सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी आर्थिक मदत व क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच प्रणीत गणेश आढाव याला हाँगकाँग येथील आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी, तर स्नेहा एस. कमलदिन्नी हिला आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले. प्रगती गायकवाड हिच्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तिला हिंद केसरी स्पर्धेसाठी आर्थिक मदत देण्यासही मान्यता देण्यात आली.
रस्ते, नाले आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती
शहरातील विविध प्रभागांमधील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण आणि हॉटमिक्स पद्धतीने सुधारणा करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक १० मधील एम्पायर इस्टेट नाल्याची दुरुस्ती, प्रभाग क्रमांक ५ मधील रस्त्यांवरील खोदलेले चर बुजविणे, तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील चऱ्होली, वडमुखवाडी आणि चोविसावाडी येथील महापालिका इमारती, स्वच्छतागृहे, पावसाळी जलवाहिन्या आणि चेंबर दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ९ मधील खराळवाडी, कामगारनगर, यशवंतनगर आणि उद्यमनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, तर प्रभाग क्रमांक १७ मधील प्रेमलोक पार्क, दळवीनगर आणि इंदिरानगर परिसरातील रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील चिखली-मोरेवस्ती येथील अंतर्गत रस्ते, प्रभाग क्रमांक ६ मधील धावडेवस्ती, गुळवेवस्ती, भगतवस्ती, चक्रपाणी वसाहत, सद्गुरुनगर आणि लांडगेवस्ती परिसरातील रस्त्यांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक ८ मधील विविध सेक्टर, जलवायु विहार सोसायटी आणि डिस्ट्रिक्ट सेंटर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
रुग्णालयांच्या सुविधांचे बळकटीकरण
महापालिकेच्या रुग्णालयांसाठी अत्याधुनिक वॉशिंग मशीन खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. नवीन भोसरी आणि जिजामाता रुग्णालयातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ७८ प्रकारची वैद्यकीय पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. जिजामाता रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागातील किरण सी-आर्म आणि एक्स-रे यंत्रणेचे निकामी झालेले संगणकीय प्रणालीचे काम बदलून यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यासही मान्यता देण्यात आली.
चिखलीतील गृहप्रकल्पासह नागरी सुविधांची कामे
चिखली सेक्टर १७ व १९ येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृहप्रकल्पातील उर्वरित सीमाभिंतीचे बांधकाम आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील इमारतींची प्रलंबित दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. शहरातील १०० गणेश विसर्जन स्थळांवर निर्माल्य संकलनासाठी कलश खरेदी व वितरणाच्या आदेशाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
जुनी सांगवी येथील इंद्रप्रस्थजवळील नाल्याच्या प्रवाहाची दिशा बदलणे आणि घाट परिसराचे सुशोभीकरण करणे, प्रभाग क्रमांक १२ मध्ये रस्त्यांवरील नामफलक, पेव्हिंग ब्लॉक, पादचारी मार्ग आणि तळवडे स्मशानभूमीची देखभाल-दुरुस्ती अशा कामांनाही मान्यता देण्यात आली. याशिवाय ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विद्युतविषयक कामांसाठी कर्मचारी पुरविणे आणि महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था करण्याच्या निविदांनाही मंजुरी देण्यात आली.
नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देणाऱ्या सावित्रीबाई फुले अकादमीच्या (वाकड) संचालक पदाला पुढील कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास आणि मासिक मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महापालिका क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी नियुक्त सल्लागाराच्या नेमणुकीलाही मुदतवाढ देण्यात आली.
याशिवाय शहरातील ब्राँझ म्युरल्स, पुतळे व कलाकृतींच्या निर्मिती कामातील धातूच्या दरवाढीमुळे निर्माण झालेल्या फरकाच्या रकमेबाबत मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली. डांगे चौक ते आदित्य बिर्ला रुग्णालय मार्गावरील सुशोभीकरणाच्या दिव्यांसाठी वीजमीटर बसविण्याच्या खर्चाचेही अवलोकन करण्यात आले.
एकूणच, शहरातील विविध प्रभागांमधील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासह आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सुविधांच्या बळकटीकरणावर स्थायी समितीने भर दिला.






