पुणे जिल्ह्यातील १२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ७८.९४ कोटींचा दिलासा; राज्यातील एकूण २०.७२ लाख शेतकऱ्यांना लाभ
काशिनाथ शिंदे
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आणखी ४ लाख ८७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येत आहे. यामुळे आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या राज्यातील एकूण २० लाख ७२ हजार शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यातील १२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ७८ कोटी ९४ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे आणि पुनर्गठित कर्जांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे.
महाआयटीमार्फत संगणकीय पडताळणी केल्यानंतर आतापर्यंत चार टप्प्यांत २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२, तर चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
यापूर्वी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५ लाख ८५ हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आता नव्याने ४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत आहेत.
एकूण १८ हजार ४० कोटींचा लाभ
या योजनेतून आतापर्यंत एकूण २० लाख ७२ हजार पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळत आहे. पात्र शेतकऱ्यांची नावे आणि त्यांना मिळणाऱ्या लाभाची रक्कम दर्शविणारी विभाग व जिल्हानिहाय यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.






