महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!

चाकणमध्ये मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; ३,२०० कोटींची गुंतवणूक, रोजगाराच्या १८ हजार संधी

काशिनाथ शिंदे

पुणे: महाराष्ट्राला केवळ देशाचे वाहन उत्पादन केंद्र न ठेवता भविष्यातील वाहतूक तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’पासून ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’कडे वाटचाल करताना उत्पादनाबरोबरच संशोधन, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान विकास आणि नवकल्पनांना प्राधान्य दिले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चाकण येथील मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मार्टिन ब्रुडरम्युलर, कंपनीचे जागतिक प्रमुख डॉ. ओला कॅलेनियस, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. यॉर्ग बुर्जर, पुणे मर्सिडीज-बेंझचे कार्यकारी संचालक संतोष अय्यर यांच्यासह कंपनीचे जागतिक व भारतीय अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन उद्योगाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. देशातील एकूण मोटार वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, राज्याचे उद्दिष्ट केवळ वाहन निर्मितीपुरते मर्यादित नाही. इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, वाहनांसाठी संगणकीय प्रणाली, रचना आणि संशोधन-विकास या क्षेत्रांतही महाराष्ट्राला जागतिक नेतृत्व मिळवून द्यायचे आहे.

मर्सिडीज-बेंझने चाकणमधून भारतीय बाजारपेठेबरोबरच आशियाई आणि जागतिक बाजारपेठांसाठी उत्पादन करावे. भविष्यातील बॅटरी तंत्रज्ञान, संगणकीय प्रणाली आणि वाहतूक संशोधनासाठी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट

राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत २०३० पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी महामार्गांवर जलद विद्युतभारण केंद्रे उभारणे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावर शाश्वत वाहतूक सुविधा विकसित करणे तसेच बॅटरी पुनर्वापराला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे.

See also  गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!

भविष्यातील वाहन हे केवळ चार चाकांवर धावणारे साधन राहणार नसून संगणक, ऊर्जा प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा एकत्रित आविष्कार असेल. या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

३६ तासांत ६५० ग्राहकांचा प्रतिसाद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित पुणे-पुरंदर विमानतळ आणि वाढवण बंदर यामुळे महाराष्ट्राची जागतिक बाजारपेठांशी जोडणी अधिक मजबूत होणार आहे. मोठी बाजारपेठ, सक्षम उत्पादन व्यवस्था, कुशल अभियंते आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर राज्य गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाबाबत अवघ्या ३६ तासांत सुमारे ६५० ग्राहकांनी स्वारस्य दाखविल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

३,२०० कोटींची गुंतवणूक; १८ हजार जणांना रोजगार

मर्सिडीज-बेंझच्या चाकण प्रकल्पात सुमारे ३ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पातून सुमारे १ हजार २०० जणांना थेट रोजगार मिळाला असून, पुरवठादार आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून सुमारे १८ हजार व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रकल्पाच्या विस्तारानंतर अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाचे उत्पादन सुरू होणे ही महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीची महत्त्वपूर्ण पायरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज – सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मर्सिडीज-बेंझ कंपनीचे गेल्या तीन दशकांपासून महत्त्वपूर्ण योगदान आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थानिक उत्पादनाचा प्रारंभ हा राज्याच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. विद्युत ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरणपूरक उत्पादन तंत्रज्ञानाचा संगम असलेली ही निर्मिती पुणे भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी सज्ज असल्याचे दर्शवते.

 

पुणे जिल्ह्यात जागतिक दर्जाचा इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून महाराष्ट्राला भविष्यातील वाहतूक क्षेत्रात सक्षम करण्याचे स्वर्गीय अजित पवार यांचे स्वप्न साकार होत आहे. आधुनिक वाहतूक तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ संकल्पनेला पूरक आहे.

See also  बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयाने पुण्याच्या विकासाला मिळणार नवी दिशा!

महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागांत जलसंधारण, भूजल संशोधन आणि जलसुरक्षेसाठी जागतिक उद्योग समूहांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुण्याच्या पालकमंत्री म्हणून उद्योग क्षेत्रातील सर्व घटकांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील. उद्योगांसमोरील अडचणी सोडविण्यासाठी शासन ठामपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मार्टिन ब्रुडरम्युलर, कंपनीचे जागतिक प्रमुख डॉ. ओला कॅलेनियस आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. यॉर्ग बुर्जर यांनी मनोगत व्यक्त केले. पुणे मर्सिडीज-बेंझचे कार्यकारी संचालक संतोष अय्यर यांनी प्रास्ताविकातून कंपनीच्या गेल्या तीस वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

 

  • Related Posts

    ‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव

    राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची चमक दाखवत घवघवीत…

    सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह

    पीसीयूमध्ये आंतरराष्ट्रीय ‘क्रेस्ट सीटीएफ २.०’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच देशांतील १,६०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील वाढते धोके…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!

    महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!

    ‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव

    ‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव

    सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह

    सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    शहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्य

    शहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्य

    मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!

    मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!