मद्यपान करताना झालेल्या वादातून ४२ वर्षीय मित्राची हत्या; खाडीकिनारी फेकलेला मृतदेह पोलिसांनी शोधला, मदत करणारा दुसराही अटकेत
काशिनाथ शिंदे
डोंबिवली : मद्यपान करताना झालेल्या वादातून जवळच्या मित्राची हत्या केल्यानंतर तब्बल तीन आठवडे आरोपी अस्वस्थ होता. मृत मित्र वारंवार स्वप्नात दिसत असल्याने झोपही लागत नव्हती. अखेर या मानसिक अस्वस्थतेतून त्याने थेट पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी खाडीकिनारी टाकलेला मृतदेह शोधून काढला. या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
विशाल कदम (वय ४२) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, प्रभू करकडे (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तर संदेश म्हात्रे (वय ४२) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
मद्यपान करताना वाद, मित्राचा जीव घेतला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २० दिवसांपूर्वी प्रभू करकडे आणि विशाल कदम हे संदेश म्हात्रे याच्या घरी एकत्र मद्यपान करत होते. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक संघर्षात झाले. संतापलेल्या प्रभूने विशालला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विशालचा जागीच मृत्यू झाला.
मृत मित्र स्वप्नात दिसू लागला अन् आरोपी पोहोचला पोलिसांत!
हत्या केल्यानंतर प्रभूने गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर त्याला वारंवार मृत मित्राची स्वप्ने पडू लागली. स्वप्नातून दचकून जागे होणे आणि सततची अस्वस्थता यामुळे त्याची झोप उडाली होती. जवळपास तीन आठवडे या त्रासात घालवल्यानंतर अखेर त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला.
कबुलीनंतर खाडीकिनारी मृतदेहाचा शोध
प्रभूने ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात जाऊन शरणागती पत्करली. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली देत मृतदेह कुठे टाकला होता, याची माहिती पोलिसांना दिली. गुन्हे शाखेने ही माहिती डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवून खाडीकिनारी असलेल्या परिसरातून विशालचा मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, प्रभू ज्या घरात भाड्याने राहत होता, त्या घराचा मालक संदेश म्हात्रे यालाही पोलिसांनी डोंबिवली पश्चिम येथील राहत्या घरातून अटक केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेमुळे डोंबिवली परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






