सामाजिक बांधिलकी जपत देहूगावातील ‘वात्सल्य’ वसतिगृहात फराळ व भेटवस्तूंचे वाटप; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला आनंद
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : सणांचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता वंचित घटकांसोबत वाटून घेण्यातच खरे समाधान असते, हा सामाजिक संदेश देत कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने देहूगाव येथील ‘वात्सल्य’ अनाथ व दिव्यांग मुलांच्या निवासी वसतिगृहात दिवाळी साजरी करण्यात आली. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित या उपक्रमात मुलांना दिवाळी फराळ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
समाजातील अनाथ, दिव्यांग आणि दुर्लक्षित घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा, या उदात्त हेतूने संस्थेने हा उपक्रम राबविला. दिवाळीच्या निमित्ताने मुलांसोबत वेळ घालवत संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संतोष दादा कदम, सचिव नंदकुमार महाडिक, खजिनदार अरुण यादव, कार्याध्यक्ष अंकुर चव्हाण, ज्येष्ठ मार्गदर्शक कॅप्टन श्रीपत कदम, दाभोळकर साहेब, संदीप सपकाळ सर, माजी अध्यक्ष रुपेश मोरे, अनिल कोकीरकर, सचिन कदम, सतीश कळमकर, कौस्तुभ नायकवडी, सोहम कदम, साई कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. संदीप कदम यांनी संस्थेच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितकारी उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद दाभोळकर यांनी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था आणि वात्सल्य अनाथ वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी आपल्या मनोगतातून समाजातील अधिकाधिक अनाथ व दिव्यांग व्यक्तींना तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सर्व सभासद, मार्गदर्शक आणि हितचिंतक यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
‘सेवा, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी हाच आमचा ध्यास!’ या ध्येयवाक्याला साजेसा उपक्रम राबवून कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेने दिवाळीचा खरा अर्थ कृतीतून अधोरेखित केला





