सीईआयआर प्रणालीच्या मदतीने येरवडा परिमंडळाची दमदार कामगिरी; दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद
काशिनाथ शिंदे
पुणे : दिवाळीच्या सणानिमित्त पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत करण्याची विशेष मोहीम राबवत येरवडा पोलीस परिमंडळाने तब्बल ४० मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. सुमारे १० लाख रुपये किमतीचे हे मोबाईल गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी केंद्र शासनाच्या सीईआयआर (Central Equipment Identity Register) प्रणालीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्यानुसार परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील सहा पोलीस ठाण्यांच्या अंमलदारांनी सीईआयआर प्रणालीचा वापर करून हरवलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला. या तपासादरम्यान संबंधित मोबाईल फोन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्येही वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मोबाईल वापरकर्त्यांशी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एकूण ४० मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १० लाख रुपये आहे.
गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील जेतापुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल फोन परत करण्यात आले.
या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्त ब्रह्मदेव गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस ठाण्यांतील अंमलदार आणि सीईआयआर प्रणालीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पुणे शहर पोलिसांचे आभार मानले. दिवाळीच्या सणात पोलिसांनी दिलेली ही भेट नागरिकांसाठी आनंदाची ठरली असून, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांची मालमत्ता परत मिळवून देण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





