उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन; ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन | ६५.२८ कोटींचा ५६५ मीटर लांबीचा उड्डाणपूल सेवेत
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची रेल्वे फाटकावरील प्रतीक्षा आता संपणार असून, वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. पिंपरी डेअरी फार्म येथील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. याच कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.
महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे फाटक बंद होण्याची कटकट संपणार!
पिंपरी, पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार आहे. शगुन चौकमार्गे इंदिरा गांधी पुलावरून जाणाऱ्या वाहनांची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. याशिवाय संत तुकारामनगर मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच परिसरातील वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.
६५ कोटींचा ५६५ मीटर लांबीचा भव्य उड्डाणपूल
पिंपरी डेअरी फार्म येथील या उड्डाणपुलासाठी ६५.२८ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. पुलाची एकूण लांबी ५६५ मीटर, तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे मार्गावरील भागाची लांबी ४५ मीटर असून, या ठिकाणी रुंदी १९.५ मीटर आहे.
दापोडी-निगडी रस्त्याकडील पोहोच रस्ता १३५ मीटर, तर पिंपरी बाजूकडील पोहोच रस्ता १४५ मीटर लांबीचा आहे. याशिवाय सेवा रस्त्यांची उभारणी करण्यात आली असून, पुलासह सेवा रस्त्यांवर पादचाऱ्यांसाठी पदपथांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाकडून जुलै २०२२ मध्ये ५.९६ एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या प्रकल्पाचे काम साकारण्यात आले.
ल क्षेत्रीय कार्यालयाला मिळणार नवी इमारत
शहरातील नागरिकांना नागरी सुविधा, तक्रार निवारण आणि विविध प्रशासकीय कामांसाठी ल क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे या कार्यालयासाठी सुसज्ज आणि आधुनिक इमारत उभारण्याच्या दृष्टीने भूमिपूजन करण्यात आले. नव्या इमारतीमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्यासह नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शहराच्या विकासाला पायाभूत सुविधांची जोड
यावेळी बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असून, वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे. डेअरी फार्म येथील उड्डाणपूल नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील मोठा अडथळा दूर करणार असून, परिसरातील व्यापार, उद्योग आणि दैनंदिन व्यवहारांनाही चालना देणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, शहराच्या भविष्यातील वाहतुकीचा विचार करून पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. या पुलाच्या रचनेपासून पोहोच रस्ते आणि सेवा रस्त्यांपर्यंत वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुविधांचा विचार करण्यात आला आहे. या पुलामुळे शगुन चौक, साई चौक येथील वाहतूक कोंडी तसेच पिंपरी पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना दर्जेदार आणि सोयीस्कर सुविधा देण्यावर महापालिकेचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला आर.पी.आय. गटनेते कुणाल वाव्हळकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, कुशाग्र कदम, संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, पंकज भालेकर, विराज लांडे, धर्मपाल तंतरपाळे, नगरसदस्या संगीता ताम्हाणे, भीमाताई फुगे, मनीषा लांडे, वर्षा जगताप, निकिता कदम, प्रियांका कुदळे, प्रतीक्षा जवळकर, सारिका मासुळकर, अरुणा लंघोटे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, माजी नगरसदस्य राजेंद्र जगताप, शाम लांडे, माजी नगरसदस्या सीमा सावळे, सुनीता वाघेरे, सुजाता पालांडे, आशा शेंडगे, उपायुक्त अण्णा बोदडे, अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.






