रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, हॅकेथॉनसह विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे प्रभावी प्रदर्शन
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, तांत्रिक कौशल्यांना आणि नवोपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) ‘टेकफेस्ट २०२६’ या अभियांत्रिकी तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थांमधील १,५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, संगणक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आव्हाने आणि विविध नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले.
असोसिएट डीन अमित पांचवडकर आणि डॉ. पी. ए. देशमुख यांनी महोत्सवाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. यामध्ये विविध तांत्रिक स्पर्धा, नवोपक्रम आव्हाने आणि सर्जनशील उपक्रम राबविण्यात आले. टीम मेसाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘गॅलॅक्सिया २०२६’मध्ये अभियांत्रिकी आव्हाने, मशिनिंग, रोबोटिक्स आणि मोटर स्पोर्ट सिम्युलेशनचा समावेश होता.
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ‘स्ट्रक्चरल शोडाऊन’ ही पूल मॉडेल तयार करण्याची स्पर्धा, ‘बियॉन्ड द बेंचमार्क’ तांत्रिक प्रश्नमंजुषा, क्षेत्रीय सर्वेक्षण स्पर्धा, ‘इकोव्हिजन’ शाश्वतता विषयावरील पोस्टर स्पर्धा, ‘द साइट इन्व्हेस्टिगेशन’ तांत्रिक खजिना शोध मोहीम, ‘कॅडनोव्हा’ ऑटोकॅड आधारित आराखडा स्पर्धा आणि ‘३-डी शोडाऊन’ मॉडेल प्रिंटिंग स्पर्धा घेण्यात आल्या.
इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार विभागाच्या वतीने ‘नेक्सस २०२६-२७ : ड्रिव्हन बाय आयडियाज’ हा उपक्रम सादर करण्यात आला. यामध्ये फॉर्म्युला हार्डवेअर, एरो एक्स, पिट स्टॉप प्रोटोकॉल आणि ‘पीसीसीओई गॉट टॅलेंट’ यांचा समावेश होता. या उपक्रमाची संकल्पना फॉर्म्युला वन स्पर्धेवर आधारित होती.
संगणक अभियांत्रिकी विभागाच्या ‘अनंत्या ’२६’ या उपक्रमात कोडिंग, सायबर सुरक्षा, हॅकेथॉन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) या विषयांवर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या. ‘शी सॉल्व्हज ३.०’ या स्पर्धेसाठी १०९ संघांनी नोंदणी केली होती. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग) विभागाच्या वतीने ‘आर्टिमास २०२६-२७’ अंतर्गत ‘हॅकमॅट्रिक्स ५.०’, डेटाथॉन आणि सायबर सुरक्षा आव्हाने आयोजित करण्यात आली.
क्रेसा आणि पीसीसीओई एसीएम एसआयजीएआय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अन्वेषण ३.०’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ‘प्रॉम्प्टिफाय’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आव्हान, ‘द किलर्स ट्रेल’ ही रहस्य उलगडण्याची स्पर्धा आणि ‘लॉजिक लॅम्प ३.०’ ही सांघिक कोडिंग व बिडिंग स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एआयएमएसए विभागानेही विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले.
या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, मशिनिंग, मोटर स्पोर्ट सिम्युलेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध उपयोगांची माहिती मिळाली. त्याचबरोबर सांघिक कार्य, सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यास प्रोत्साहन मिळाले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.






