काटेपुरम चौक ते रामकृष्ण चौकादरम्यान श्रीनगर लेन क्रमांक ३ येथे आढळले पायाचे अवशेष; परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात मानवी पायाचे तुटलेले अवशेष आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. काटेपुरम चौक ते रामकृष्ण चौकादरम्यान श्रीनगर लेन क्रमांक ३ येथील रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला. प्रथमदर्शनी मानवी पाय गुडघ्यापासून धारदार शस्त्राने कापल्याचे दिसून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरात तपास सुरू केला आहे. आढळलेले अवशेष नेमके कोणाचे आहेत, तसेच ते तेथे कसे आले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, हा घातपाताचा प्रकार आहे की अन्य काही घटना, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
ऐन सणासुदीच्या काळात पिंपळे गुरवसारख्या गजबजलेल्या परिसरात मानवी अवशेष आढळल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून, या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचे आव्हान सांगवी पोलिसांसमोर आहे.






