निराधारांच्या सुख-दुःखात रमले आयुक्त; प्रत्येकाची आस्थेने केली विचारपूस, निवारा केंद्राच्या कार्याचे केले कौतुक
काशिनाथ शिंदे
पिंपरी : दिवाळीचा सण म्हटले की आनंद, उत्साह आणि आप्तस्वकीयांचा सहवास आठवतो. मात्र, नात्यांची साथ हरवलेल्या आणि आयुष्यात एकटेपणा वाट्याला आलेल्या बेघर व्यक्तींसाठी हा सण अनेकदा वेदनादायी ठरतो. अशा निराधारांच्या आयुष्यात मायेचा आणि आपुलकीचा प्रकाश पसरवत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यंदाची दिवाळी पिंपरी येथील ‘सावली’ निवारा केंद्रातील ७५ बेघर व्यक्तींसोबत साजरी केली. आयुक्तांनी पदाचा मोठेपणा बाजूला ठेवून प्रत्येकाशी साधलेला संवाद आणि दाखवलेली आपुलकी यामुळे केंद्रात मायेचा अनोखा सोहळा रंगला.
यावेळी आयुक्तांनी बेघर बांधवांसोबत दिवाळीचा फराळ केला. त्यांच्या जीवनातील सुख-दुःख, संघर्ष आणि अनुभव जाणून घेतले. अनेकांच्या आयुष्यातील वेदनादायी प्रसंग ऐकताना आयुक्तही भावूक झाले. प्रत्येक व्यक्तीजवळ थांबून त्यांनी आस्थेने विचारपूस केली.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून आणि ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ या संस्थेच्या सहकार्याने ‘सावली’ निवारा केंद्र चालविले जाते. रस्त्यावर निराधार अवस्थेत आढळलेल्या, नातेवाईकांपासून दुरावलेल्या तसेच मानसिक व शारीरिक आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना या केंद्रात सुरक्षित निवारा, भोजन, औषधोपचार आणि आपुलकीची साथ दिली जाते. अनेकांसाठी हे केंद्र केवळ निवाऱ्याचे ठिकाण नसून आयुष्याच्या उत्तरार्धात मिळालेले नवे कुटुंब ठरले आहे.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रत्येक लाभार्थ्याशी स्वतंत्रपणे संवाद साधत ते येथे कसे आले, त्यांची काळजी कशी घेतली जाते, जेवण व औषधोपचार वेळेवर मिळतात का, काही अडचणी आहेत का, याची माहिती घेतली. केवळ औपचारिक विचारपूस न करता त्यांनी प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.
केंद्रातील काही लाभार्थ्यांनी सांगितलेले जीवनातील संघर्ष आणि अनुभव हृदयद्रावक होते. आयुष्याच्या प्रवासात नाती दुरावली, माणसांची साथ सुटली; मात्र अशा व्यक्तींना पुन्हा जगण्याचा आधार देण्याचे काम ‘सावली’च्या माध्यमातून होत असल्याचे पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे कर्मचारी लाभार्थ्यांची घेत असलेली काळजी, त्यांना दिला जाणारा सन्मान आणि केंद्रातील आपुलकीचे वातावरण यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी आयुक्तांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून केंद्राच्या कामकाजाची, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची आणि संस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. समाजातील दुर्लक्षित आणि निराधार घटकांना जगण्याचा नवा आधार देणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्राच्या कामकाजातील अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
या प्रसंगी उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ संस्थेचे एम. ए. हुसैन, व्यवस्थापक गौतम थोरात, समाजसेवक ॲग्नस फ्रान्सिस आदी उपस्थित होते.
दिवाळीच्या निमित्ताने आयुक्तांनी दिलेली ही भेट केंद्रातील लाभार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली. निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा स्नेहसोहळा सामाजिक संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा सुंदर संदेश देऊन गेला.
“प्रेम, आपुलकी आणि सन्मानही तितकेच महत्त्वाचे!”
सावली निवारा केंद्र हा समाजातील निराधार, बेघर आणि वंचित व्यक्तींना आधार देणारा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. दिवाळीसारखा आनंदाचा सण या माता-पित्यांसोबत साजरा करताना त्यांच्या भावना जाणून घेता आल्या. प्रत्येक व्यक्तीला केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा मिळणे पुरेसे नाही, तर त्यांना प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची वागणूक मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सावली केंद्राच्या माध्यमातून हे काम संवेदनशीलतेने केले जात आहे. केंद्रातील प्रत्येक लाभार्थ्याची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. संस्थेच्या स्थापत्यविषयक समस्या जाणून घेतल्या असून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका






