ज्ञानेश्वर लांडगे : हा पुरस्कार पीसीईटीच्या व्यवस्थापनाचा सन्मान; विठ्ठल काळभोर : पीसीसीओईच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा
काशिनाथ शिंदे
पिंपरी : नवोन्मेष, संशोधन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष कक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि संस्थेची नवोन्मेष परिषद (आयआयसी) यांच्या वतीने महाविद्यालयाला प्रतिष्ठेचे ‘फोर स्टार रेटिंग’ प्रदान करण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे पीसीईटीच्या व्यवस्थापनाचा सन्मान असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाविद्यालयाने परिसरात नवोन्मेष, संशोधन आणि नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने निर्धारित केलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले. या उपक्रमांची दखल घेत आयआयसीने पीसीसीओईला फोर स्टार मानांकन देऊन गौरविले. एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम, शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष कक्षाचे मुख्य नवोन्मेष अधिकारी डॉ. अभय जेरे आणि सहायक नवोन्मेष संचालक दिपान साहू यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, पीसीसीओईच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याचे सांगितले. महाविद्यालयाने यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील ‘ॲस्ट्रोव्हर्स अक्षयन २०२६’ स्पर्धेत प्रथम क्रमांक, ‘फॉर्म्युला भारत’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील व्यवसाय योजना सादरीकरणात तृतीय क्रमांक आणि ‘नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन ॲप्लिकेशन अँड रिसर्च’ स्पर्धेत देशपातळीवर द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच ‘इंटरनॅशनल रोव्हर चॅलेंज २६’ मध्ये ‘इमर्जिंग टीम ऑफ द इयर’ हा बहुमान मिळवत जागतिक क्रमवारीत १२ वे स्थान पटकावले आहे.
पीसीईटीचे खजिनदार शांताराम गराडे यांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. राष्ट्रीय स्तरावरील ‘ई-बाजा एसएई इंडिया’ स्पर्धेत पीसीसीओईने एकूण द्वितीय उपविजेतेपद मिळविले. यामध्ये स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, एंड्युरन्स, मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स आणि सेल्स या विभागांतील पुरस्कारांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची ही कामगिरी संचालक, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
.पीसीसीओईचे संचालक व प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले की, या मानांकनामुळे नवोन्मेष, उद्योजकता आणि बौद्धिक संपदा निर्मितीची संस्कृती विकसित करण्यासाठी संस्थेची असलेली बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे. महाविद्यालयाने १०० पैकी तब्बल ८६.७७ गुणांचा प्रभावी कामगिरी निर्देशांक मिळविला असून, संस्थेचे सर्व १०५ नवोन्मेष आणि उद्योजकता उपक्रम मंजूर झाले आहेत. नवोन्मेषाधारित शिक्षण, उद्योजकीय विचारसरणी, बौद्धिक संपदा हक्कांविषयी जागरूकता आणि नवउद्योग विकासासाठी संस्थेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे.
या उपक्रमांच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत पीसीसीओईच्या नवोन्मेष आणि उद्योजकता विभागाच्या अधिष्ठाता तथा आयआयसीच्या अध्यक्षा डॉ. रजनी पी. के., सहयोगी अधिष्ठाता आयईएन तथा आयआयसीचे उपाध्यक्ष डॉ. मुबीन तांबोळी आणि सहयोगी अधिष्ठाता आयईएन तथा आयआयसीचे संयोजक डॉ. अजय गाढे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, नियामक मंडळाचे सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी संपूर्ण पीसीसीओई टीमचे अभिनंदन केले.
नवोन्मेष, संशोधन आणि जागतिक स्तरावरील स्पर्धांमधील सातत्यपूर्ण यशामुळे पीसीसीओईने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, फोर स्टार मानांकनाने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.






